लातूरमध्ये पाणी टंचाई दूर होण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळ्याचे तीन महिने संपल्यानंतरही लातूर जिल्ह्यासाठी म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. सध्या होणारा पाऊस पिके जगण्यासाठी उपयुक्त ठरला आहे परंतु जिल्ह्यातील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी पर्याप्त ठरणारा नाही. लातूरकरांना अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. एका दिवसात किमान १५० मि.मी. पाऊस सर्वत्र झाला तरच कांही प्रमाणात पाणीसाठा होऊ शकतो असे म्हटले जात आहे.

महाराष्ट्रातील सतत दुष्काळाची झळ सोसणारा जिल्हा म्हणून लातूर जिल्ह्याची ओळख निर्माण झालेली आहे. पावसाळ्याचे तीन महिने संपून गेले तरी जिल्ह्यातील सर्व नद्या, नाले, ओढे, लघू तलाव, पाझर तलाव, मध्यम प्रकल्पात पाणीसाठा झालाच नाही. शेतकऱ्यांनी पेरणी केली परंतु कांही ठिकाणी ती वाया गेली. अनेक शेतकऱ्यांनी पिकात नांगर घालून जमिन रब्बी पेरणीसाठी तयार केली. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून जिल्ह्यात दररोज थोडातरी पाऊस पडत आहे त्यामुळे पिकांची गरज भागलेली आहे. परंतु पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. आता जरी पिके जगली असली तरी उत्पादनात मोठीच घट येणार असल्याचे सांगितले जात आहे.

लातूर जिल्ह्यातील वार्षिक सरासरीच केवळ ८०२ मि.मी. एवढी आहे. वार्षिक सरासरीच्या ५० टक्के सध्या पाऊस झालेला आहे. जुन आणि जुलै हे खरे तर दोन महिने मुख्य पावसाचे गृहित धरले जातात. या दोन महिन्यातील पावसावरच पेरणीचे काम केले जाते. लातूर जिल्ह्यात या दोन महिन्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिलेले आहे. शेतकऱ्यांनी जोखीम घेऊनच पेरणी केली. दुष्काळाची चाहूल लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे.

कृषी विभागाच्या वतीने सलग किमान ७५ मि.मी. पाऊस झाला तरच पेरणी करावी असे सांगितले जाते परंतु जिल्ह्यात असा पाऊस तीन महिन्यात झालाच नाही. शेतकऱ्यांनी जोखीम घेऊन पेरणी केली. माळरानावरील पिकांनी केव्हाच माना टाकल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पेरणीही वाया गेलेली आहे. पिक विमा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भरलेला आहे. पाऊसच योग्य झालेला नसल्याकारणाने दुष्काळी परिस्थिती आहे त्यामुळे पिक विम्यातील २५ टक्के रक्कम तातडीने शेतकऱ्यांना वाटप करावी अशी मागणी आता केली जात आहे. जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यासाठी सर्वांच्या नजरा आता पावसाकडेच लागलेल्या असून मोठ्या पावसासाठी देवाला साकडे घातले जात आहे.