हाफीज सईद, दाऊद, मसूद दहशतवादी घोषित,‘यूएपीए’ कायद्यानुसार कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहशतवाद रोखण्यासाठी नुकत्याच मंजूर करण्यात आलेल्या ‘बेकायदा कारवाया प्रतिबंध’ कायद्यांतर्गत (यूएपीए) चार दहशतवाद्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. पुलवामा हल्ल्याचा मास्टर माइंड जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर हा यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड, लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफीज सईद दुसऱ्या तर गँगस्टर दहशतवादी दाऊद इब्राहिम तिसऱ्या क्रमांकावर आहे. दहशतवादी जकीउर रहेमान लख्वीचाही यादीत समावेश आहे.

हाफीज सईद, मसूद आणि दाऊदला यापूर्वी संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलेले आहे. मसूद अजहर हा मोस्ट वॉण्टेड दहशतवादी असून, 2001 च्या संसदेवरील हल्ल्यासह पठाणकोट हवाई दल, पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला आदींमध्ये त्याचा सहभाग आहे. हाफीज सईदने मुंबईतील 2008 च्या दहशतवादी हल्ल्यासह हिंदुस्थानात अनेक ठिकाणी रक्तपात घडविला आहे. दाऊद इब्राहिमचा 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात सहभाग होता.