केईएममध्ये रुग्णांसाठी कृत्रिम उद्यान, वन स्टॉप सेंटर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लैंगिक अत्याचार, कौटुंबिक हिंसा, मानसिक छळ अशा अत्याचारांना बळी पडलेल्या महिलांसाठी केईएममध्ये वन स्टॉप सेंटर उभारण्यात आले आहे. या योजने अंतर्गत कृत्रिम उद्यानाची निर्मिती करण्यात आली असून या उद्यानामुळे अत्याचारग्रस्त महिलांना आल्हाददायक वातावरणात वावरता येणार आहे. या वन स्टॉप सेंटरचे उद्घाटन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.

लैंगिक अत्याचार, कौटुंबिक हिंसा, मानसिक छळ अशा कोणत्याही प्रकारच्या अत्याचारास बळी पडलेल्या महिलांसाठी या सेंटरची स्थापना केली आहे. सेंटरमध्ये वैद्यकीय सल्लागार कक्ष, तात्पुरता निवारा कक्ष, वैद्यकीय तपासणी कक्ष, समुपदेशन कक्ष असे विविध कक्ष आहेत. सेंटरमध्ये वैद्यकीय अधिकारी, मानसोपचारतज्ञ, स्त्राrरोगतज्ञ, समुपदेशक, कायदाविषयक सल्लागार उपलब्ध आहेत. त्यांच्यामार्फत अत्याचारग्रस्त महिलेला तातडीने उपचार, मानसिक बळ आणि कायदेविषयक मदत उपलब्ध करून दिली जाईल. पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविणे किंवा न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदविणे आदींची सुविधाही सेंटरमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. फॉरेन्सिक विभागामार्फत पुरावे मिळविण्यासाठीची मदतही या ठिकाणी उपलब्ध असेल.

देशात आतापर्यंत 728 ठिकाणी वन स्टॉप सेंटर सुरू करण्यात आले आहेत. बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी ‘पोक्सो’ कायदा अधिक कडक करण्यात आला आहे. प्रत्येक जिह्यात स्वतंत्र बाल सुरक्षा केंद्रे असायला हवीत. तिथे बालकांनाही समुपदेश, मार्गदर्शन, वैद्यकीय मदत, कायदेविषयक मदत देण्यात येईल, असे स्मृती इराणी म्हणाल्या.यावेळी शालेय शिक्षणमंत्री डॉ. आशीष शेलार, आमदार अजय चौधरी, नगरसेवक अमेय घोले, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख हरीश पाठक, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रवीण भावसार आदी उपस्थित होते.