
>> स्वप्नील साळसकर
मालवणी माणूस नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने शहरात राहत असला तरी तो मनाने मात्र कायम आपल्या गावातच वावरत असतो. वर्षानुवर्षे चालणारे सण, उत्सव, लोकसंस्कृतीचे चित्र नेहमी तो आपल्या डोळय़ांसमोर उभे करतो. ‘भातालय’ या कवितासंग्रहातील मालवणी कविताही अशाच प्रकारे आपल्या मुलखाची ओढ निर्माण करतात.
‘भातालय’ या काव्यसंग्रहातून कवी नामदेव गवळी यांनी स्वतः अनुभवलेले मालवणी मुलखातील लोकजीवन कवितेच्या माध्यमातून वाचकांसमोर उभे केले आहे. मालवणी माणूस मुळातच स्वाभिमानी, मोडेन पण वाकणार नाही अशा स्वभावाचा. त्यामुळे शहरात नोकरी, व्यवसाय करताना त्याचा रुबाबही तेवढाच मोठा असतो. गावात राहणारा शेतकरी शेती, मोलमजुरी करून कुटुंबाचा रहाटगाडा ओढत असेल, पण सण, उत्सव मात्र तेवढाच दबाज्यात साजरे करतो. मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी, दशावतारी नटसम्राट बाबी कलिंगण यांनी मालवणी बोली सातासमुद्रापार पोहोचवली. मालवणी भाषा आता साहित्यातही पुढे येत असून मुंबई विद्यापीठात मालवणी भाषा हा विषयही अभ्यासक्रमात घेण्यात आला आहे.
हेल काढून बोलली जाणारी प्रेमळ मालवणी भाषा सर्वांच्याच हृदयाला भिडून जाते. कवी नामदेव गवळी यांनी मालवणी मुलखाचे संपूर्ण दर्शन कवितांच्या माध्यमातून वाचकांना घडवले. ‘तुमका ना खय तरी बघल्यासारखा वाटता, मिरग लागी येता तेवा लाकडा भरी व्हतास, कुणग्यात तेवा पसरलेली कवळा जाळी व्हतास’ या कवितेच्या माध्यमातून कवीने मालवणी माणूस घरातील सर्व कामे पत्नीच्या अनुपस्थितीत अगदी काळजीपूर्वक करीत कुटुंबाचा सांभाळ करीत असल्याचे चित्र उभे केले आहे.
‘भातालय’ ही कविता नोकरी करणाऱया चाकरमान्याला उद्देशून असून आम्हाला चाकरी करून जीवन जगणे जमणार नाही, तर या लाल मातीत जिवाचे रान करीत सोने पिकवतो, शेणातच आमची शाळा भरते आणि पिकवलेल्या भाताच्या राशीच आम्ही पुजतो, असे शेतकऱयांचे म्हणणे आहे.
‘राखनो’ या कवितेत शेतशिवाराची राखण करणारो पांडगो सावंत याची व्यक्तिरेखा साकारली आहे. रात्री काळाकुट्ट अंधार, दूरवर भुंकणाऱया कुत्र्यांचा आवाज, कुंपणाभोवती घिरटय़ा घालणारी डुकरांची पिलावळ, गावात देसरूढीसाठी वाजणाऱया ढोलाच्या आवाजाप्रमाणे पडणारे दवबिंदू त्यातच अधूनमधून पत्र्याच्या डब्यावर काठीने आवाज काढत माळकऱयाची ओरड सुरू आहे आणि त्यात पांडगो मात्र थंडीत कुडकुडत सकाळ केव्हा होते याची वाट पाहत आहे.
रस्ते तुडवत जाताना या कवितेतून गावात राहणारा मालवणी माणूस सर्व हालअपेष्टा सहन करतो. मात्र जगण्याची जिद्द तो सोडत नाही. ‘देवचार’ या कवितेतून मालवणी माणूस प्रचंड श्रद्धाळू आहे याचे जळजळीत उदाहरण समोर येते. तो प्रचंड भावनिक असून त्याच्यावर वर्षांनुवर्षे देवचाराबद्दल असणारी भीती आणि धाक आहे. मात्र खरे काय आणि खोटे काय याबाबत अद्यापि कोणालाच काही कळलेले नाही. आंब्यावरचो, जांब्यावरचो, हेळय़ावयलो, पायरीवयलो, काजऱयावयलो, सुरंगीवयलो, पिपळावरचो, फणसावरचो अशीच देवचाराची नावे सिंधुदुर्गात ऐकिवात आहेत.
होळी सणात सिंधुदुर्गात खेळे घरोघरी जातात. शबय मागितली जाते. अशाच एका खेळय़ामधील एक प्रेम प्रकरण मांडण्यात आले आहे. एका घराकडे गाण्याचा कार्यक्रम होतो. सर्व जण दुसऱया घराकडे जाण्यास निघतात. परंतु पाणी पिण्याचे निमित्त करून एक तरुण त्याच घराजवळ थांबतो. कारण कृष्णाला ओवाळण्यासाठी आलेली त्याची प्रेयसी त्याला पाहायची असते. दोघेही एकमेकांकडे बघत राहतात. मात्र तेवढय़ात त्या मुलीच्या घरातून आवाज येतो ‘चाय घेवन जावक सांग तेका’ आणि त्या तरुणाला अक्षरशः घाम फुटतो. दोघांच्याही पायात कापरी भरते आणि चहा पिण्यासाठी तो घराबाहेरच्या बाकडय़ावर बसतो. चहा पिताना शेजारी खांबाला चिकटून डोळय़ांत पाणी भरून प्रेयसी त्याच्याकडे बघत उभी असते. महाशिवरात्रीला कुणकेश्वरची सिंधुदुर्गातील एक प्रसिद्ध जत्रा. या जत्रेचीही प्रत्येकाला वर्षभर तेवढीच आतुरता असते. त्यासाठी अगोदर काही दिवस पैशाची जोडणी करून खरेदीचे प्लॅनही आखले जातात. जत्रेत काय खरेदी करायचे, कशा प्रकारे मजा करायची, काय खायचे याची लिस्टच तयार केली जाते. यात्रेचा दिवस उजाडतो. मालवणी माणूस जत्रेत दाखल होतो. फिर फिर फिरतो. जत्रेची सर्व मजा घेतो. मात्र घराकडे जाताना त्याची पावले जड होतात.
सावितरी, पोषण आहार, गाऱहाणे असणारी बा रवळनाथा अशा जवळपास 69 कविता या संग्रहात असून खऱया अर्थाने सिंधुदुर्गातील ग्रामीण भागाचे चित्र डोळय़ांसमोर उभ्या करतात. यामुळे या कविता वाचकांच्या नक्कीच पसंतीस उतरतील यात शंकाच नाही.
भातालय
लेखक ः नामदेव गवळी
प्रकाशक ः लोकवाङ्मयगृह प्रकाशन
पृष्ठ ः 100, मूल्य ः 150 रुपये
























































