
गेल्या आठवडाभरात टप्प्याटप्प्यानंतर कोसळत असलेला पाऊस विश्रांती घेत आहे, असे वाटत असतानाच शनिवारी पुन्हा मुसळधार पावसाने मुंबईकरांना दणका दिला. काही प्रमाणात रस्ते, रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला. सहा दिवसांच्या गणपती–गौरींचे विसर्जन भरपावसात करावे लागले. गणेशभक्तांचे हाल झाले. येत्या 24 तासांत मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
आज सकाळपासून संततधार असलेला पाऊस दुपारनंतर जोरदार पडायला लागला. अडीचनंतर पावसाचा जोर वाढल्याने रस्ते तसेच मध्य, हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूकही 15 ते 20 मिनिटांनी उशिराने होती. काही ठिकाणी रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली. सखल भागांत पाणी साचल्याने रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले होते. अनेक ठिकाणी बेस्ट वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली. गणपती–गौरींच्या विसर्जनाच्या वेळीच जोरदार पावसाने सुरुवात केल्याने गणेशभक्तांचे हाल झाले. कुटुंबासोबत गणेशदर्शनासाठी सकाळी बाहेर पडलेल्या मुंबईकरांना पावसामुळे अडकावे लागले. रेल्वे स्थानकावर मोठय़ा प्रमाणात प्रचंड गर्दी झाली.
सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत
मुंबई मिलीमीटर
कुलाबा 53.2 मिमी
सांताक्रुज 59.2 मिमी
अंगावर झाडाची फांदी पडून महिला जखमी
शनिवारी सकाळपासून पडणाऱया मुसळधार पावसामुळे सांताक्रुज पश्चिम येथे झाडाची फांदी पडून महिला जखमी झाली. उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. नानी बंगलो, रुम नंबर 3, चॅपल लेन, सांताक्रुज पश्चिम येथे संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास विमल लाल (65) या पादचारी महिलेच्या अंगावर झाडाची फांदी पडली. या घटनेत विमल यांच्या डोक्याला मार लागला असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लोकल विस्कळीत
शहर आणि उपनगरात कोसळत असलेल्या जोरदार पावसाने मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकलचे वेळापत्रक काल गडबडले. पावसाने दृश्यमानता कमी झाल्याने सकाळपासूनच लोकलच्या वेगावर निर्बंध आले. मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने तर पश्चिम रेल्वे 10 मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे कामावर जाणाऱया मुंबईकरांसह गणपती उत्सवासाठी आलेल्या गर्दीला लोकल सेवेचा फटका बसला.
आठवडाभरापासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने मुंबईत वाहतूककोंडी होत आहे. बुधवारी तर पावसाने कहर केल्याने मुंबईची लाइफ लाइन असलेल्या लोकलचे तिन्ही मार्ग ठप्प होऊन मुंबईकर जागोजागी अडकून पडले होते. शनिवारी बहुतेक कार्यालये बंद असली तरी गणपतीदर्शनाची तसेच खासगी कार्यालये सुरू असल्याने गाडय़ांना गर्दी होती. त्यात पुन्हा मुंबईला पावसाने चांगलेच झोडपल्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवांवर परिणाम झाला. मध्य रेल्वेवरील सर्वच मार्गांवरील उपनगरी रेल्वे पंधरा मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला, तर पश्चिम रेल्वेवर धीम्या आणि जलद लोकलही विलंबाने धावत होत्या. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आणि कमी दृश्यमानतेमुळे मोटरमनला लोकल चालवणे कठीण होत होते. त्यामुळे सीएसएमटी, चर्चगेटच्या दिशेने जाणाऱया अप लोकल उशिराने धावत असल्याने तेथून सुटणाऱया लोकलच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला.
लांब पल्ल्याच्या गाडय़ाही लेट
कोकणातील जादा गणपती स्पेशल गाडय़ांमुळे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. मांडवी एक्स्प्रेस दोन तास लेट झाल्याने रत्नागिरी–खेड तालुक्यात ती उशिरा आली, तर सीएसएमटी–सावंतवाडी गणपती स्पेशल पाच तास उशिराने धावत होती. संगमेश्वर गणपती स्पेशलही तीन तास उशिराने धावत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पंपांद्वारे पाण्याचा निचरा
महापालिका क्षेत्रात पडणाऱया पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक वेगाने व्हावा, यासाठी महापालिकेच्या सर्व सहा उदंचन केंद्रांमधील पंप आवश्यक तेवढय़ा संख्येने सुरू करण्यात आले होते. प्रत्येक उदंचन केंद्रात तेथील आवश्यकतेनुसार सहा ते दहा एवढय़ा संख्येने पंप असून या प्रत्येक पंपाची क्षमता दर सेकंदाला तब्बल 6 हजार 600 लिटर पाण्याचा उपसा करण्याची आहे. सहा उदंचन केंद्रांमध्ये एकूण 43 पंप असून त्या त्या भागातील पावसाचे प्रमाण लक्षात घेता त्यापैकी 24 पंप सुरू करण्यात आले होते. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली.



























































