दापोली मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसला गळती; नेतेमंडळीची डोकेदुखी वाढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच दापोली विधान सभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली असल्याने नेतेमंडळीची डोकेदुखी कमालीची वाढली आहे. पक्ष सोडणारे शेकडो कार्यकर्ते शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आणि युवा सेनेचे योगेश कदम यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास दाखवत शिवसेनेत प्रवेश करत असल्याने शिवसेनेच्या गोटात मात्र जल्लोषाचे वातावरण आहे. गणेशोत्सवाच्या गेल्या सहा दिवसात दापोली मतदार संघातील शेकडो कार्यकर्त्यांनी रामदास कदम यांच्या जामगे निवासस्थानी शिवबंधन हाती बांधले.

दापोली मतदार संघावर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले संजय कदम दापोली मतदार संघाचे आमदार आहेत. मात्र यावेळी चित्र पालटण्याची शक्यता आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी या मतदार संघात लक्ष घातले असल्याने या मतदार संघावर पुन्हा भगवा फडकणार हे निश्चित आहे. 2014च्या निवडणुकीत शिवसेनेच्या हातातून निसटलेला दापोली मतदार संघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी गेली तीन वर्ष रामदास कदम व युवा सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य योगेश कदम मतदार संघाची बांधणी करत आहेत. योगेश कदम यांनी या मतदार संघातील प्रत्येक वडीवस्ती पिंजून काढली आहे. मतदारांना शिवसेनेची ध्येय धोरणे पटवून दिली आहेत. सध्या शिवसेनेत सुरू असलेले इनकमिंग हे याचेच द्योतक असून आगामी काळात आणखी बरेच कार्यकर्ते शिवबंधन बांधण्यास उत्सुक आहेत.

गणेशोत्सवासाठी गेले सहा दिवस रामदास कदम हे त्यांच्या जामगे निवास्थानी होते. या दरम्यान राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामध्ये दापोली तालुक्यातील पालगड, विसापूर, खेड व मंडणगड तालुक्यातील काही गावातील ग्रामस्थांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे विभाग अध्यक्ष विकास चव्हाण यांनी देखील आपल्या समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असल्याने शिवसेनेची ताकद नक्कीच वाढली आहे. गेले काही दिवस सुरु असलेल्या इनकमिंग बाबत बोलताना पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी समाधान व्यक्त केले आहे. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दापोली मतदार संघात शिवसेनेत सुरु झालेले इनकमिंग ही दापोली मतदार संघावर भगवा फडकण्याची नांदी आहे. या निवडणुकीत दापोली मतदार संघावर भगवा फडकणार ही काळ्या दगडावरची रेघ तर आहेच परंतु विरोधकांचे डिपॉझिटही जप्त होईल असे भाकीत रामदास कदम यांनी केले आहे.