केज विधानसभा लढवण्यास शिवसेना सक्षम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद आणि शक्ती वाढलेली आहे. गावागावामध्ये शिवसैनिकांची फौज निवडणुकीसाठी सज्ज आहे. शिवसेना-भाजपा युतीमधून केजची जागा शिवसेनेला सुटली तर केज विधानसभा निवडणुक लढवण्यास शिवसेना सक्षम आहे असा विश्वास बीड जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी व्यक्त केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून बीड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या उपस्थितीत व बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या अध्यक्षतेखाली केज विधानसभा मतदारसंघाचा शिवसेनेचा मेळावा पार पडला तत्पूर्वी शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

या मेळाव्यात बोलताना संपर्कप्रमुख आनंद जाधव पुढे म्हणाले, शिवसेनाप्रमुखांच्या विचाराने शिवसेना तेवत ठेवण्याचे काम शिवसैनिकांनी केले आहे. सत्ता असो वा नसो शिवसैनिक गावागावामध्ये सामान्य माणसाला आधार देण्याचे काम करतो आहे. शिवसैनिकांच्या मदतीचा हात सामान्य माणसाला जगण्यासाठी धीर आणि प्रेरणा देतो म्हणूनच शिवसेना लोकांना आपला पक्ष वाटतो. केज विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत असा विश्वास संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी व्यक्त केला. तत्पूर्वी आपल्या भाषणात बोलताना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक म्हणाले, शिवसेनेची उर्जा व उत्साह पाहून केज विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा कारण केज विधानसभेवर भगवा फडकवण्याकरीता येथील शिवसैनिक सक्षम असल्याचे आवाहन केले. तसेच युती झाली तर शिवसैनिकांच्या भावना समजून घेऊन केज विधानसभेचा उमेदवार बदलावा अशी मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व ना.पंकजाताई मुंडे यांच्याकडे करणार असल्याचे मत जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी व्यक्त केले. यावेळी केज व अंबाजोगाई तालुक्यातील पदाधिकारी, शिवसैनिक, महिला, युवा सैनिक प्रचंड संख्येने उपस्थित होते.