
उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे एका हॉटेलमध्ये हवाईदलाच्या माजी कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सुसाईड नोटमध्ये त्याने देशातील आर्थिक मंदी आणि भ्रष्टाचाराला कंटाळून जीवनयात्रा संपवत असल्याचे सांगत यासाठी माजी आर्थिक मंत्री पी. चिदंबरम यांना जबाबदार ठरवले आहे. बिजन दास (55) असे त्यांचे नाव असून ते मूळचे आसामचे आहेत.
ही सुसाईड नोट चार पानी असून यात दास यांनी चिदंबरम यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळेच देशात आर्थिक मंदी आल्याचा आरोप केला आहे. तसेच आपल्या गायक मुलाला मदत करावी अशी विनंतीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. त्याचबरोबर आपला मृतदेह प्रयागराज येथेच दफन करण्यात यावा अशी विनंतीही त्यांनी या सुसाईड नोटमध्ये पोलिसांना केली आहे.
दास 6 सप्टेंबर रोजी कामानिमित्त आसामहून प्रयागराज येथे आले होते. येथील खुल्दाबाद भागातील प्रयाग हॉटेलमध्ये ते थांबले होते. रात्री ते रुममध्ये गेल्याचे कर्मचाऱ्यांनी बघितले. पण दुसऱ्या दिवशी ते रुममधून बाहेर आलेच नाहीत. यामुळे कर्मचाऱ्याने मॅनेजरला याबद्दल सांगितले. त्यानंतर दुसऱ्या चावीने रुम उघडला असता कुलरच्या मागे पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दास यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. त्यावेळी पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली.
या सुसाईड नोटमध्ये दास यांनी चिदंबरम यांच्या भ्रष्टाचारामुळेच आर्थिक मंदी आल्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर मोदींना मुलाची मदत करण्याची विनंती केली आहे. मला आत्महत्या करायची नव्हती. पण नाईलाज आहे. मी सगळ्यांना खुश ठेवू शकलो नाही. मी माझ्या मुलासाठी काहीही करू शकलो नाही. मी त्याला चांगल लहानपणही देऊ शकलो नाही. मी त्याच्यासाठी एक घरही उभारू शकलो नाही. मी देशासाठी कुटुंबासाठी काहीही करू शकलो नाही. माझ्या मुलाच नाव विवेक असून तो उत्तम गायक आहे. पण आर्थिक तंगीमुळे मी त्याच्यासाठी काहीही केलं नाही. तुमच्यापुढे अनेक आव्हाने आहेत. पण तरीही मी तुम्हांला विनंती करतो की माझ्या मुलाची मदत करा. माझ्या मुलाची शारीरिक स्थिती व्यवस्थित नाही. पण तुम्ही माझ्या मुलाची मदत कराल या आशेवर मी आयुष्य संपवत आहे. असे दास यांनी नोटमध्ये म्हटले आहे.





























































