
डोंगरीतील केसरबाई इमारत दुर्घटना ताजी असताना आज सोमवारी या भागातील एका इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाला, तर एक जखमी आहे. त्याच्यावर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षातून देण्यात आली. डोंगरी चिंच बंदर, साई धाम मॉल येथील काम सुरू असलेल्या एका इमारतीच्या स्लॅबचा काही भाग सोमवारी सकाळी 11.30च्या दरम्यान कोसळला. या स्लॅबच्या ढिगार्याखाली दोघे अडकले होते. या दोघांना ढिगार्याखालून बाहेर काढून तत्काळ जवळच्या जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यातील एकाचा मृत्यू झाला असून त्याचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. तर शब्बीर शेख (22) हा जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
























































