
काँग्रेसने ईशान्येकडील भागात नेहमीच दहशतीचे वातावरण कसे राहील याचा प्रयत्न केला. त्यासाठी भाषा, जात, संस्कृती आणि प्रांत या मुद्द्यांवरून सतत भांडणे लावत घुसखोरीला प्रोत्साहन दिले. मात्र यापुढे हिंदुस्थानातील कुठल्याही राज्यात घुसखोरांना स्थान मिळणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘एनआरसी’च्या मुद्द्यावर ठणकावून सांगितले. गुवाहाटी येथे नॉर्थ–ईस्ट डेमोक्रॅटिकच्या मेळाव्यात ते बोलत होते.
ईशान्येकडील राज्यांनी ‘एनआरसी’कर चिंता व्यक्त केली आहे. यादीतून मोठ्या प्रमाणात नागरिकांना वगळण्यात आल्याने ‘एनआरसी’च्या मुद्द्यावर अधिक गांभीर्याने काम झाले पाहिजे, असे सांगितले जात आहे. मात्र मी आश्वासन देतो की, एकही घुसखोर आसाममध्ये राहणार नाही व अन्य राज्यांमध्येही घुसखोरी करू शकणार नाही. आसामला नाहीतर संपूर्ण देशाला घुसखोरीपासून मुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ईशान्येकडील राज्याच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यावर प्रामुख्याने भर देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ईशान्येकडील भाग हिंदुस्थानचे फुप्फुस
ईशान्येकडील राज्यांचा भू–भाग हा हिंदुस्थानच्या फुप्फुसाप्रमाणे असून या ठिकाणचा 26 टक्के भाग हा वन्यभाग आहे. जो देशाला ऑक्सिजन देण्याचे काम करतो. हे लक्षात घेता या भागाच्या विकासावर केंद्र सरकार लक्ष देत आहे. ईशान्येकडील आठही राज्यांनी ‘एनईडीए’ला स्वीकारले असून 25 लोकसभांपैकी 19 लोकसभेच्या जागांवर विजय मिळवला असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्रातही ‘एनआरसी’
महाराष्ट्रात घुसखोरी करून राहणार्या बांगलादेशी नागरिकांना शोधण्याबरोबर अनधिकृतपणे वास्तव्य करणार्या परदेशी नागरिकांना रोखण्यासाठी ‘एनआरसी’ (राष्ट्रीय नागरिक नोंदणी) लागू होण्याची शक्यता आहे. राज्यात अवैधरीत्या स्थलांतरित झालेल्यांसाठी नकी मुंबईमध्ये डिटेन्शन सेंटर स्थापन करण्यात येणार आहे. गृहखात्याने सिडकोला पत्र लिहून नेरूळ येथे यासाठी 3 एकरचा भूखंड उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे.
‘एनआरसी’च्या यादीबद्दल संघाच्या बैठकीत चिंता
‘एनआरसी’च्या यादीत आसामधील 3 कोटी 11 लाख 21 हजार 4 लोकांचा समावेश करण्यात आला आहे तर 19 लाख 6 हजार 657 जणांना या यादीत स्थान मिळू शकलेले नाही. यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदुस्थानी नागरिकांचा समावेश असल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.























































