ऍमेझॉन, फ्लिफकार्ट इ.इ.

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अमित घोडेकर

खरेदीसाठी गर्दीत बाजारात, दुकानात जा या गोष्टींना शॉपिंग ऍप्स हा उत्तम पर्याय कधीचाच उपलब्ध झाला आहे. यात आता अजूनही क्रांतिकारी बदल होणार आहेत…

गेल्या दोन वर्षांपासून दिवाळीमध्ये पहिल्यांदा एका संकेतस्थळावर ऑनलाइन सेल लागला होता. आपल्याकडच्या दुकानात किंवा एखाद्या मॉलमध्ये लागतो अगदी तसाच सेल इंटरनेटवर ऑनलाइन सुरू झाला. या सेलअगोदर जशी दुकानाची आणि वस्तूंची जाहिरात केली जाते अगदी तशीच जाहिरात या ऑनलाइन सेलची केली गेली, या सेलमध्ये सेफ्टी पिनपासून ते कार आणि पेनपासून कोल्हापुरी चपलांपर्यंत पाहिजे त्या गोष्टी विकायला ठेवल्या गेल्या होत्या. या सर्व वस्तू बाजारभावापेक्षा स्वस्त आणि उत्तम गुणवत्ता असणाऱया होत्या हे तर सांगायला नकोच आणि जर जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नाही तर तुमच्या घरून ती वस्तू परत घेतली जाणार आणि तुम्हाला तुमचे पैसे परत.

जसा सेल लागल्यावर दुकानाबाहेर गर्दी होते तशीच मग इंटरनेटच्या दुनियेत प्रचंड गर्दी झाली आणि दोन दिवसांत लाखो लोकांनी या सेलमधून अनेक वस्तू खरेदी केल्या. दुकानात गर्दीच्या सिझनमध्ये जशी चेंगराचेंगरी होते तशीच चेंगराचेंगरी या ऑनलाइन सेलमध्येदेखील झाली. फक्त इथे कोणाला इजा मात्र झाली नाही. फक्त द संकेतस्थळ तीन-चार वेळेस बंद पडलं, पण लोक काही मागे हटायला तयार नव्हते. त्यामुळेच मग या दोन दिवसांत शेकडो कोटी रुपयांची उलाढाल झाली आणि एका कंपनीचे नाव अगदी बच्चो बच्चो जुबान पर आलं ते म्हणजे फ्लिपकार्ट. आजकाल तर फ्लिपकार्टने लहान मुलांना घेऊनच त्यांची जाहिरात सुरू केली आहे. त्यातला उद्देश एकच की आमच्या संकेतस्थळावर किंवा मोबाईलमधून लहान मूलसुद्धा शॉपिंग करू शकतात. स्वतः अवघ्या 10 वर्षांपूर्वी घरोघर जाऊन वस्तू विकणाऱया फ्लिपकार्टची टॅग लाइन आहे ‘अब हर विश पुरी होंगी.’ फ्लिपकार्टच्या प्रचंड मेहनतीने गेल्या वर्षी वॉलमार्ट या जगप्रसिद्ध कंपनीने फ्लिपकार्टमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामुळे फ्लिपकार्ट विश तर नक्की पूर्ण झाली आहे. आता बघूयात देशी ऍमेझॉन आता भविष्यात काय काय कारनामे करते.

रिक्षातून खाली उतरताना 500 रुपयांची नोट काढून देतो. रिक्षावाला म्हणतो साहेब सुटे नाहीत. मग हसत रिक्षावाला म्हणतो जाऊ द्या साहेब काय टेन्शन घेताय, मोबाईल आहे ना मग ‘पेटीएम’ करा ना… ‘बस पेटीएम करो’ ही जाहिरात खूप चालली. कारणही तसेच होते. पेटीएमने मोबाईलवर कोणताही आर्थिक व्यवहार करण्यासाठी आणलेली अनोखी क्रांती. ही क्रांती एवढी सोपी आणि सहज होती की लहान मुले पण म्हणू लागली की ‘बस पेटीएम करो.’ पेटीएम एवढी मोठी झाली की नंतर त्यांनी पेटीएम मॉल नावाचे ऑनलाइन संकेतस्थळ आणि मोबाईल ऍप्लिकेशनदेखील काढले. आज पेटीएम मॉलवर कपडे, मोबाईल फोन, टीव्ही अशा गरजेच्या वस्तू तर मिळतातच, पण तुम्ही पेटीएम मॉलवरून लाइट बिल, शाळेची फी किंवा अगदी गोल्ड लोनदेखील घेऊ शकता. पेटीएम मॉल म्हणजे आजची अजस्त्र गुहा झाली आहे. यात सगळं काही मिळत म्हणूनच की काय अलिबाबा या जगातील नामवंत कंपनीने पेटीएम मॉलमध्ये मोठी गुंतवणूकदेखील केली आहे.

तंत्रज्ञानातील बदलामुळे गेल्या काही वर्षांत सर्वच गोष्टीत बदल झाले आहेत आणि त्याचबरोबर चिनी बाजारपेठेचा शिरकाव व इतर अनेक कारणामुळे आजकाल लोकांचा कल स्वस्त गोष्टीr घेण्याकडे जास्त वळत असल्यामुळे बहुतांशी सर्वच गोष्टीचे आयुष्य खूप कमी झाले आहेत. पूर्वी एकदा टीव्ही किंवा फ्रीज घेतला की 10 वर्षे त्याच्याकडे बघायला लागत नसे. आता मात्र त्याच गोष्टीr काही वर्षांतच कालबाह्य होतात किंवा बिघडतात. पेटीएम मॉलच्या प्रचंड यशानंतर अलिबाबा या चीनमधल्या सगळ्यात मोठय़ा ऑनलाइन कंपनीने आता थेट स्वस्त आणि मस्त चिनी वस्तू हिंदुस्थानात आणण्याचे ठरवले आहे आणि त्यासाठी स्वतःच्या अलिबाबा या संकेतस्थळ आणि मोबाईल ऍप्लिकेशनवरून थेट अशा वस्तू उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे चिनी मालाचा शिरकाव मोठय़ा प्रमाणात होणार हे नक्की.

एकीकडे फ्लिपकार्ट, पेटीएम मॉल, अलिबाबा या ऑनलाइन शॉपिंगच्या जगत धुमाकूळ घालत असताना एक कंपनी मात्र शांतपणे आपले काम अतिशय चोखपणे करत आहे ती म्हणजे ऍमेझॉन. ऍमझॉन ही जगातील सगळ्यात मोठी ऑनलाइन शॉपिंग कंपनी जगातील कोणती वस्तू हवी असेल तर ती ऍमेझॉनवर मिळते आणि त्याची गुणवत्ता अतिशय चांगली असते. त्याचबरोबर ऍमेझॉनवर तुम्ही संगीतदेखील ऐकू शकता आणि नुकतीच ऍमेझॉन प्राइमवर तुम्ही चित्रपट किंवा टीव्ही सीरियल्सदेखील बघू शकता. म्हणजेच शॉपिंगच शॉपिंग आणि मनोरंजनदेखील.

एकंदरीत काय तर मोबाईलच्या क्रीनवर आता तुम्ही पाहिजे ती वस्तू विकत घेऊ शकता आणि शॉपिंग करताना कंटाळा आला तर संगीत ऐकत किंवा चित्रपट बघत पुन्हा शॉपिंग करू शकता. शॉपिंगचे जग प्रचंड विस्तारले आहे आणि यात क्रांतिकारी बदल होणार आहेत.

[email protected]