
पावसाळा संपत आल्यानंतर थंडीची चाहुल लागते आणि याच दरम्यान दाट धुक्यामुळे उत्तर हिंदुस्थानातील जनजीवन विस्कळीत होते. तसेच याच दरम्यान धान्य पिकांची कापणी होते आणि उरलेला कचरा, तण पेटवून दिले जातात. त्यामुळे उत्तर हिंदुस्थानातील राज्यांमध्ये धुरक्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. ज्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. दिल्ली सारख्या शहरांमध्ये तर अत्यंत गंभीर स्थिती त्याचा फटका बसतो.
याच कारणास्तव दिल्लीतील केजरीवाल सरकारने नोव्हेंबर महिन्यात पुन्हा एकदा ऑड-इव्हन फॉर्म्युला अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा 4 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या दरम्यान हे नियम लागू करण्यात येतील अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी केली आहे.
नोव्हेंबर महिना जवळ आला की शेतातील पिकं कापल्यानंतर उरलेला कचरा, तण हे जाळले जातात. दिल्लीच्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये शेती मोठ्याप्रमाणावर होते. त्यामुळे शेतातील कचरा जाळल्यानंतर दिल्लीत गॅसचेंबर सारखी स्थिती होते. प्रदूषणाचा स्तर वाढतो, दृश्यमानता कमी होते. त्यामुळेच त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे.































































