जनतेच्या मनातला महाराष्ट्र घडवायचाय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जातीधर्मांतील मतभेद दूर सारून एकजुटीने जनतेच्या मनातला सुजलाम् सुफलाम् महाराष्ट्र घडवायचाय, असा निर्धार शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केला. शनिवारपासून जनआशीर्वाद यात्रेचा झंझावात कोकणात सुरू झाला. कोकणात सर्वत्र भगवे वातावरण असून येत्या महिन्यातही सर्वत्र भगवाच दिसणार आहे, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी देताच कोकणवासीयांनी शिवसेनेच्या जयघोषाने परिसर दुमदुमवून टाकला.
वेंगुर्ले येथील स्वागत सभेने आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात झाली. त्यानंतर कुडाळ येथील गांधी चौकातील विजय संकल्प सभा झाली. ‘सावंतवाडी, कुडाळ झाँकी है…कणकवली अभी बाकी है’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यात्रेदरम्यान मिळत असलेले जनतेचे प्रेम व आशीर्वाद हीच आपली ताकद असून त्या बळावरच आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र भगवामय करायचा आहे, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

कुडाळनंतर हा भगवा झंझावात कणकवलीत पोहोचला. ढोलताशांच्या गजरात स्वागत करतानाच कणकवली शहर शिवसेनेच्या वतीने आदित्य ठाकरे यांना शिवधनुष्य देण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तरुणाईची झुंबड उडाली होती. आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले की, काही वर्षांपूर्वी आपण कणकवलीत आलो होतो तेव्हाही असेच जल्लोषात स्वागत झाले होते, परंतु त्यावेळी इथे आपले आमदार, खासदार नव्हते. मात्र कोकणवासीयांनी शिवसेनेला भरघोस मतदान करून भगवे वातावरण निर्माण केले. त्या मतदारांचे आभार मानण्यासाठी मी आलो आहे असे ते म्हणाले. शिवसेनेने मागील निवडणुकीवेळी दिलेली वचने पूर्ण करणारच, असे आश्वासनही त्यांनी दिले.

याप्रसंगी शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, म्हाडा अध्यक्ष उदय सामंत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, निरीक्षक प्रदीप बोरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी मंत्री सचिन अहिर आदी मान्यवरांसह असंख्य शिवसैनिक आणि युवासैनिक उपस्थित होते.

‘स्वाभिमान’ला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला खिंडार पडले. वेंगुर्ले येथील विजय संकल्प सभेमध्ये आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत स्वाभिमान पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यात उभादांडा गावचे सरपंच देवेंद्र डिचोलकर, सदस्य आशू फर्नांडिस, अपेक्षा बागायतकर, केरकर आदींचा समावेश होता. आदित्य ठाकरे यांनी भगवे उपरणे घालून त्यांचे पक्षात स्वागत केले.