
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक जमिनी विकण्याची परवानगी मिळावी म्हणून उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. भाजपने त्यांना तसे आमिष दाखवले असेल तर राष्ट्रवादी हा प्रयत्न हाणून पाडेल, असा इशाराही मलिक यांनी दिला.
शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा अबाधित राहिला पाहिजे. त्याला जर कोणी धक्का लावत असेल तर जनतेला सोबत घेऊन त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस कडाडून किरोध करेल, अशी स्पष्ट भूमिका नकाब मलिक यांनी उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना मांडली. सातारा किंवा अन्य कोणत्याही संस्थानांतील जमिनी कायद्याने विकता येत नाहीत. स्वतःसाठी वपरता येत नाहीत. भाजप सरकार या जागा विकण्याच्या आमिषापोटी राजे, संस्थानिकांना भाजपमध्ये आणत आहेत. उदयनराजे हे सुद्धा याच आमिषाने भाजपमध्ये गेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जमिनी अबाधित राहिल्या पाहिजेत, असे मलिक म्हणाले. सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव होईल. 1999 च्या पराभवची त्यांना आठवण करून देऊ. ते कुठल्या पद्धतीने कामे करतात. रात्री व दिवसा कुठल्या अवस्थेत असतात हे सातारा जिह्यातील जनतेला माहित आहे. जरी ते पक्ष सोडून गेले असले तरी ती जागा आम्ही निवडून आणू, असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला.

























































