नवा महाराष्ट्र घडवायला निघालोय! रत्नागिरीत आदित्य ठाकरेंची विराट विजयी संकल्प सभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जो आवाज मुंबई पर्यंत पोहचत नाही तो आवाज त्यांच्या समस्या ऐकण्यासाठी मी आज कोकणात आलोय. मला बेरोजगारमुक्त महाराष्ट्र, कर्जमुक्त महाराष्ट्र, दुष्काळमुक्त महाराष्ट्र, प्रदुषणमुक्त महाराष्ट्र, सुशिक्षित महाराष्ट्र, सुजलाम सुफलाम महाराष्ट्र, नवा महाराष्ट्र घडविण्याची जिद्द…प्रचंड आत्मविश्वास व्यक्त करत शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी कोकण वासियांचे आशीवार्द मागितले.

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा चौथा टप्पा कोकणात सुरु झाला. रत्नागिरीत निवळी येथील विजयी संकल्प मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी आज माझा राजकीय दौरा नसून शिवसैनिकांना मी सलाम करायला आलोय असे नम्रपणे सांगताच ‘शिवसेना जिंदाबाद’, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’, अशा घोषाणांनी सभागृह दुमदुमले.

आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा आज कोकणात आली. सकाळी वेंगुर्ला येथून सुरु झालेली यात्रा आज रात्री नऊ वाजता रत्नागिरीत पोहचली. निवळी येथील सिध्दीगिरी कार्यालय शिवसैनिकांच्या गर्दीने खचाखच भरला होता.सर्वत्र भगवे वातावरण, भगवा जल्लोष होता. सकाळपासून जनतेचे आशीर्वाद घेत…जनतेशी संवाद साधत निघालेल्या आदित्य ठाकरे सभागृहात येताच शिवसेना जिंदाबाद…शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है घोषणांनी परिसर दुमदुमला. शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी कोकण आणि शिवसेना हे अतूट नाते आहे. आज महाराष्ट्र भर मी फिरतोय, जसे आताच उदय सामंत यांनी मी रत्नागिरीतून निवडणूक लढवावा असे जाहिर केले असेच प्रेम मला संपूर्ण महाराष्ट्रात मिळतेय, मी आता पर्यंत या जनआशीर्वाद यात्रेत साडेचार हजार किमी पर्यंतचा प्रवास केला पण मी किलोमीटर मोजत नाही तुमचे प्रेम मोजतोय अशी भावनिक उद्गार आदित्य ठाकरे यांनी काढले.

मी तर याला तीर्थयात्रा म्हणतोय. कोकणात भरपूर देऊळं आहेत देवळातही आशीर्वाद घ्यायला हवा पण मी आज तुमचा आशीर्वाद घ्यायला आलोय.आपण लोकसभा निवडणूकीत भरभरून मतदान केलेत,संपूर्ण देश, महाराष्ट्र भगवा झाला म्हणून तुमचे आभार मानायला आलोय,ज्यांनी मतदान केले नाही,जे आमच्या विरोधात लढले त्यांनाही आमच्या सोबत येण्याचे आवाहन करण्यासाठी आल्याचे आदित्य ठाकरे यांनी आत्मविश्वासाने सांगितले. यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर,शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, उपनेते म्हाडा अध्यक्ष उदय सामंत, माजी पालकमंत्री रवींद्र माने, जि.प.अध्यक्षा स्वरुपा साळवी, जिल्हा महिला संघटक वेदा फडके, कोकण समन्वयक प्रदीप बोरकर,जिल्हाप्रमुख विलास चाळके,माजी मंत्री सचिन आहिर, माजी आमदार सुभाष बने,उपजिल्हाप्रमुख महेश म्हाप, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, जि.प.सदस्य परशुराम कदम, उपस्थित होते.

आदित्य ठाकरेंनी रत्नागिरीतून लढावे – उदय सामंत
आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे भविष्यातील नेतृत्व आहे. त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्रात लाभला आहे. शिवसेना नेते, युवासेनेप्रमुख आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरीतून लढावे मी माझा मतदार संघ सोडायला तयार आहे असे शिवसेना उपनेते म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी जाहिर केले.