पश्चिम रेल्वेच्या दुसऱ्या एसी लोकलला ब्रेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वेवर सध्या एकच वातानुकूलित लोकल धावत असली तरी दुसरी दाखल होऊनही तिला चालवण्यात तांत्रिक अडचणी आल्या आहेत. एका एसी लोकलचा समावेश केल्याने त्या जागी धावणाऱ्या 12 साध्या लोकलच्या फेऱ्यांवर गदा आली आहे. त्यामुळे साध्या लोकल गाडीला सहा किंवा तीन एसी लोकलचे डबे जोडण्याचा पर्याय पश्चिम रेल्वेसमोर आहे. परंतु अशा प्रकारे डबे जोडण्याचे तंत्रज्ञान पश्चिम रेल्वेकडे उपलब्ध नाही. त्यामुळे अर्ध वातानुकूलित लोकल तांत्रिक कचाट्यात सापडली आहे. त्यामुळे या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न पश्चिम रेल्वेकडून होत आहे.

25 डिसेंबर 2017मध्ये पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार मार्गावर पहिली वातानुकूलित लोकल सेवेत आली. या एसी लोकलमुळे साध्या लोकलच्या बारा फेऱ्यांवर गदा आली आहे. त्यामुळे वातानुकूलित लोकलसाठी जादा भाडे देण्यास प्रवाशांचा विरोध आहे. साध्या लोकलच्या फेऱयांवरच गदा येत असल्याने प्रवाशांकडून अद्यापही वातानुकूलित लोकल गाडीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. आणखी दोन एसी लोकल पश्चिम रेल्वेवर दाखल झाल्या असून पहिली वातानुकूलित देखभाल-दुरुस्तीसाठी कारखान्यात नेण्यात आली आहे. त्याऐवजी नवीन आलेली दुसरी वातानुकूलित लोकल सध्या पश्चिम रेल्वेवर धावत आहे. तसेच तिसऱ्या एसी लोकलची चेन्नईच्या आयसीएफ कारखान्यातून मुंबईत रवानगी झाली असून तिच्या काही तांत्रिक चाचण्या अजून शिल्लक आहेत.

फर्स्ट क्लासचे तीन डबे काढण्याचा प्रयत्न

साध्या लोकलचे प्रथम श्रेणीचे तीन डबे काढून त्याऐवजी एसी लोकलचे तीन डबे जोडण्याचा विचार सुरू आहे. पण त्यावरही अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. या तांत्रिक अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न पश्चिम रेल्वेकडून सुरू आहे.