
नवी मुंबई सेझबाधित शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी 130 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र सहा वर्षांनंतरही या निधीतील एक छदामही प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेला नाही. त्यामुळे हा निधी नेमका गेला कुठे, असा प्रश्न नवी मुंबईकरांना पडला असून सिडकोच्या या पुनर्वसन घोटाळय़ाच्या चौकशीची मागणी होत आहे.
उरण परिसरात भागीदारीतून नवी मुंबई सेझची ( एनएमएसईझेड) निर्मिती करण्यात येत आहे. यात एनएमएसईझेड 74 तर सिडकोची 26 टक्के भागीदारी आहे. याकरिता जेएनपीटी आणि सिडकोने द्रोणागिरी नोड परिसरातील हजारो हेक्टर जमीन लिजवर दिली आहे. नवी मुंबई सेझनिर्मितीच्या कामामुळे उरण परिसरात अनेक गावांतील शेतकरी, मच्छीमारांना आपल्या पारंपरिक व्यवसायाला मुकावे लागले आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱया हजारो प्रकल्पग्रस्तांवर उपासमारीची वेळ आल्याने आर्थिक नुकसानभरपाई तसेच पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी सिडको, जेएनपीटी, नवी मुंबई सेझ याविरोधात मागील दहा वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते रामदास कोळी तसेच अन्य संघटनांना याविरोधात 2013 मध्ये नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलकडे याचिका दाखल केली होती. याची दखल घेत प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी एनएमएसईझेडने 130 कोटी रुपये सिडकोकडे सुपूर्द केले होते. परंतु यातील एक छदामही शेतकऱयांना दिलेला नाही.
थेट बारा कोटींचे शेअर्स खरेदी केले सिडकोकडे सुपूर्द करण्यात आलेल्या 130 कोटींच्या निधीचे केले काय, याविषयी माहिती घेण्यासाठी आरटीआय कार्यकर्ते दिलीप कोळी यांनी सिडकोचे (सेझ) महाव्यवस्थापक यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. मात्र 15 मार्च 2019 रोजी लेखी स्वरूपात दिलेल्या माहितीमध्ये 130 कोटींपैकी 12 कोटी 94 लाख 67 हजार 735 रुपये किमतीचे नवी मुंबई सेझ कंपनीचे शेअर्स खरेदी केले असल्याची कागदपत्रे जोडण्यात आली आहेत. या रिसेटलमेंट आणि रिहॅबिटेशन या कामासाठी एक छदामही खर्च केल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे पुनर्विकासासाठी आलेल्या पैशांतून शेअर्स खरेदी करणाऱया सिडकोच्या कारभाराविरोधात आश्चर्य व्यक्त होत आहे.



























































