
आईसोबत वाद घातला हेच डोक्यात धरून एका 12 वर्षांच्या विद्यार्थ्याने खासगी शिकवणी घेणाऱया शिक्षिकेला चाकूने भोसकून तिची हत्या केल्याची खळबळ जनक घटना आज गोवंडीच्या शिवाजी नगरमध्ये घडली. मुलाने केलेल्या हल्ल्यात शिक्षिकेचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले.
सोनू (नाव बदललेले) हा विद्यार्थी आयशा अस्लम हुशिए (30) यांच्याकडे खासगी शिकवणीला जायचा. आयशा त्यांच्या घरात खासगी शिकवणी घ्यायची. पण आजचा दिवस आयशासाठी शेवटचा ठरला. शिकवणुकीला आलेला सोनू अचानक आक्रमक झाला आणि सोबत आणलेला चाकू आएशाच्या पोट व पाठीत खुपसला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आएशाला परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात नेले, मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
आएशा आणि सोनूच्या आईमध्ये पैशांच्या कारणावरून वाद झाला होता. तो वाद सोनूने पाहिला होता.आईला बडबड केल्याचा राग सोनूच्या मस्तकात भिनला आणि अवघ्या 12 वर्षाच्या विद्यार्थ्याने शिक्षिकेची हत्या केल्याचे बोलले जात आहे. 12 वर्षाच्या मुलाने शिक्षिकेला ठार मारल्याचे वृत्त परिसरात पसरताच खळबळ उडाली. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.





























































