
मुंबईकरांना लोकलचे वेळापत्रक सांगणारे लोकप्रिय ‘एम-इंडिकेटर ऍप’ आता आणखीन आधुनिक होणार आहे. मुंबईकरांना आपली रोजची लोकल पकडण्याची घाई करताना आता मोबाईलवर अलार्म लावण्याची सोय ‘एम-इंडिकेटर ऍप’वर उपलब्ध होणार असल्यामुळे मुंबईकरांना त्यांची लोकल वेळेवर आहे की लेट आहे हे समजणार आहे. रेल्वेच्या उद्घोषणेप्रमाणे ऍपच व्हॉइस कॉल करून प्रवाशांना जागे करणार असल्याने ‘लेट’ असलेली लोकल पकडणेही प्रवाशांना शक्य होणार आहे.
लोकल, बस, मेट्रो-मोनोचे वेळापत्रक सांगणार्या लोकप्रिय ‘एम-इंडिकेटर ऍप’वर लवकरच लोकल पकडण्याची वेळ झाल्याचा अलर्ट देणारी यंत्रणा उपलब्ध होणार आहे. ही सुविधा पुढच्या आठवड्यात प्रवाशांच्या सेवेत येणार असून त्यामुळे मुंबईकरांना रोजच्या लोकलसाठी घरातून निघतानाच ‘टाइम मॅनेजमेंट करणे सोपे जाणार आहे.
लोकलच्या लाइव्ह स्टेटसची अनोखी सोय
1 सप्टेंबरपासून ‘एम-इंडिकेटर’ या प्रसिद्ध मोबाईल ऍपवर ‘लाइव्ह ट्रेन स्टेटस’ हा नवीन प्रकार लाँच करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना तुम्ही लोकलमध्ये आहात काय या ऑप्शनवर क्लिक करताना ट्रेनचे लाइव्ह स्टेटस प्रवाशांमुळेच ऍपवर देणे शक्य झाले आहे. एखादी लोकल उशिराने धावत असल्यास ती नेमकी किती वेळाने एखाद्या स्थानकात पोहोचेल, लोकलचे ठिकाण इत्यादी माहिती प्रवाशांच्या मोबाईलवर दिली जात आहे. यामुळे ट्रेनचे लाइव्ह स्टेटस कळत असून ट्रेन वेळेवर सुटली की वेळेआधी सुटली याचीही माहिती मिळत असल्याचे एम इंडिकेटरचे संस्थापक सचिन टेके यांनी सांगितले.
लोकल लेट असली तरी ऍप सावधान करणार
रेल्वे प्रवाशांना ट्रेनचे अलर्ट देणारे नवे ऑप्शन लवकरच सामील होणार आहे. त्यात नेहमीच्या लोकलचा अलार्म प्रवाशांना सेट करता येणार आहे. ही ट्रेन वेळेवर येणार आहे की लेट आहे याचीही माहिती मोबाईलमध्ये अलार्मबरोबरच रेल्वे उद्घोषणेच्या धर्तीवर अनाऊन्समेंटद्वारे प्रवाशांना मिळणार असल्याचे टेके यांनी स्पष्ट केले. एखाद्या वेळेस प्रवाशांना हवी असणारी लोकल लेट असते, मात्र ती वेळेवर सुटल्याचे समजून प्रवासी ती लोकल सोडून देतात आणि घरातून आणखीन उशिरा निघतात, मात्र लोकल उशिरानेच असल्याने ती मिळण्याची संधी असते. अशा वेळी हा अलार्म प्रवाशांना लोकल किती मिनिटे उशिराने आहे हे उद्घोषणेद्वारे प्रवाशांना सांगेल, असे टेके यांनी स्पष्ट केले.





























































