
आयआयटी प्रवेश परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या ‘सुपर 30’ संस्थेचे संस्थापक आणि गणिताचे प्रख्यात शिक्षक आनंद कुमार यांना शिक्षण क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल अमेरिकच्या संस्थेने सन्मानित करण्यात आले. ‘फाऊंडेशन फॉर एक्सेलेन्स’ या संस्थेच्या ‘द एज्युकेशन एक्सिलेन्स ऍवॉर्ड 2019’ने आनंद कुमार यांना गौरविण्यात आले आहे. कॅलिफोर्नियाच्या सॅन जोस येथे नुकताच हा सोहळा पार पडला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर आनंद कुमार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, अमेरिका आणि जगभरात राहणाऱ्या हिंदुस्थानींनी सर्व समस्यांविरोधात लढण्यासाठी शिक्षणाचे मजबूत अस्र तयार केले पाहिजे. तसे झाले तरच गरिबी, बेरोजगारी, लोकसंख्यावाढ, पर्यावरण हानी अशा अनेक समस्यांचे उपाय सापडतील. आनंद कुमार पुढे म्हणाले, हिंदुस्थानी नागरिक जगभरात अविश्वसनीय कामगिरी करीत आहेत. त्याचबरोबर आपले कर्तव्य समजून समाजाला काहीतरी परत देत आहेत.
आनंद कुमार गेल्या 18 वर्षांपासून हिंदुस्थानात ‘सुपर 30’ प्रोग्रॅम चालवत आहेत. याअंतर्गत 30 विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी निवासी व्यवस्थेसह विनामूल्य शिक्षण देतात. हे विद्यार्थी आयआयटी-जेईई परीक्षा देणारे असतात. गरीब गरजू मुलांचे आयआयटीमध्ये शिकण्याचे स्वप्न आनंद कुमार पूर्ण करीत आहेत. नुकताच त्यांच्या जीवनावर हिंदी सिनेमा प्रदर्शित झाला.


























































