मेहकरमध्ये घराची भिंत कोसळून तिघे ठार, दोन जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेहकर शहरात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शेजारच्या घराची भिंत दुसर्‍या घरावर पडून या घराची भिंत पडल्याने घरातील तिघांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. दोन वर्षांचा मुलगा दैव बलवत्तर म्हणून ढिगार्‍याखाली दबूनही बचावला आहे.

शहरात काल रात्री उशिरा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्री अंदाजे 1 वाजण्याच्या दरम्यान इमामवाडा चौकाजवळील शेख जाफर शेख बाबा यांच्या जुन्या इमारतीचा भाग कोसळला व तो शेजारच्या घरावर पडला. यामुळे शेजारच्या घराची भिंत पडली. या घटनेत तिघे जण दबून ठार झाले. तर दोघे जखमी झाले. दोन वर्षे वयाचा शेख जुनेद शेख आसिफ मात्र दैव बलवत्तर म्हणून ढिगार्‍याखाली दबून किरकोळ जखमी होऊन वाचला.

शेख आसिफ शेख अश्रफ (28), शाइस्ता बी शेख आसिफ कुरेशी (25) व फैजान कुरेशी (5) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर जखमींमध्ये ताहेर शेख अश्रफ (18), शेख जुनेद (2) असून त्यांचे वर डॉ. निलेश गट्टाणी यांच्या मल्टीरुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनास्थळी शिवसेना खासदार प्रतापराव जाधव, शिवसेना आमदार संजय रायमुलकर, नगराध्यक्ष कासम गवळी, उपनगराध्यक्ष जयचंद बाठीया, नगरसेवक तौफिक कुरेशी, तहसीलदार संजय गरकल आदींनी भेट दिली. तर रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.

यावेळी नगराध्यक्ष कासम गवळी यांनी या परिवारास नगदी एक लाख रुपये मदत दिली. तर खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमुलकर यांनी मरण पावलेल्यास प्रत्येकी चार लाख रुपये शासकीय मदत देण्यात येईल व जखमींनाही शासकीय मदत दिली जाईन तसेच पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.