गोडखाऊ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वरद चव्हाण

संग्राम समेळ. पाया भक्कम असला की कोणतीही इमारत मजबूत उभी राहण्यास वेळ लागत नाही. वडिलांनी केलेल्या व्यायामाच्या संस्कारांमुळे संग्रामचा फिटनेस वाखाणण्याजोगा आहे.

नमस्कार फिटनेस फ्रिक्स! आजच्या लेखाच्या सुरुवातीलाच मी तुम्हा सर्व वाचकांचे आभार मानू इच्छितो! अहो का म्हणून काय विचारताय? तुमचे आभार यासाठी मानत आहे कारण आजचा लेख मी लिहीत असलेला 25 वा लेख आहे. तुमच्याच बरोबर मला ‘सामना’ वृत्तपत्राचे आभार मानावेसे वाटतात. ज्यांने मला लेख लिहिण्याची संधी दिली. आजवर शाळा/कॉलेजमधील होमवर्कसुद्धा लिहिण्याचा कंटाळा करणाऱया माझ्यासारख्या माणसाला तुम्ही ‘सामना’मध्ये लेख लिहाल का असं विचारण्यात आलं, तेव्हा खरंच सांगतो हे आपल्याला जमेल का? अशी शंका मनात होतीच. पण म्हटलं करून बघायला काय हरकत आहे?

फार फार तर काय होईल? तुमच्या लिखाणात मज्जा नाही! आम्ही तुमचे लेख बंद करतोय! असा फोन येईल, यांचीसुद्धा तयारी ठेवली होती. पण जे सूचते ते मनापासून लिहिलं आणि तुम्हाला ते पसंतसुद्धा पडलं. या गोष्टीचं खरंच समाधान आहे! असो, माझा आभारप्रदर्शन आता संपवतो आणि आजच्या लेखाला सुरुवात करतो. तर, आजचे आपलं सेलिब्रिटी कलाकार आहेत एक उत्तम अभिनेता आणि सगळय़ांनाच हवा हवासा वाटणारा एक चांगला मित्र, ‘संग्राम समेळ’. संग्रामला मी आधीपासून ओळखत जरी असलो तरी आम्ही चांगले मित्र झालो. ‘ललित 205’ या मालिकेमुळे संग्रामला फार व्यायामाची आवड किंवा स्वतःच्या आहाराबद्दल अत्यंत जागरूक, अश्यातला किंवा असं काहीच नाही तर, शुटिंग सेटवर हाच माणूस बरेच वेळा चला आज पिझ्झा मागवूया, आज काय तर चायनीज मागवूया, तर कधी कधी ‘यार हॉटेलचं खाऊन खाऊन कंटाळा आला, उद्या सेटवर येताना बाजारातून चिकन किंवा चिकन खिमा आणतो’, शूट करता करता अख्ख्या युनिटसाठी बनवू असं म्हणायचा! बरं एवढं सगळं खाऊन आमचं वजन लगेच वाढायचं, हा मात्र कायम बारीकच राहिला. यावरून मला माझ्या शाळेत असलेले सहविद्यार्थी आठवले. जे अभ्यासात खरंच खूप हुशार असतात. पण आपल्याला सांगताना मात्र माझा काहीच अभ्यास झाला नाही यार असं सांगतात.

या मित्रांच्या नादात आपण निर्धास्त राहतो आणि निकाल लागल्यावर आपण अगदीच काठावर पास होतो आणि आपल्याला फसवणारे हेच मित्र मात्र चांगले मार्क्स मिळवून जातात. तब्येतीच्या बाबतीत संग्रामची तुलना या अशाच मित्रांबरोबर केली जाऊ शकते. हा माणूस कसा काय इतका बारीक राहतो? हे जाणून घ्यायची माझी खूप इच्छा होती. बोलता – बोलता मला कळलं की लहानपणापासूनच संग्रामला ना व्यायामाची आवड ना शाळेतल्या स्पोर्टस्ची त्याची आवड एकच आणि ती म्हणजे गोड पदार्थ खाणं. कुठल्याही मिठाईच्या दुकानात गेल्यावर तो 8-10 प्रकारचे गोड पदार्थ खाल्ल्याशिवाय बाहेर पडत नसे! यामुळे अर्थातच संग्रामच्या शरीराचा कल जाडेपणाकडे झुकत होता. पण संग्रामच्या आयुष्यात खरा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा त्याने अभिनेता व्हायचं ठरवलं. घरात ज्येष्ठ साहित्यिक अशोक समेळ व ज्येष्ठ अभिनेत्री संजिवनी समेळ अशी कलेची परंपरा होतीच. बाबा अशोक समेळांनी मुलाला पूर्ण तयारीत अभिनय क्षेत्रात उतरवायचे ठरवलं आणि त्याला थेट ठाणे येथील ‘मराठा मार्शल आर्टस्’मध्ये भरती केलं. तेथे सिंगल काठी, डबल काठी, तलवारबाजी, दानपट्टा याचं ट्रेनिंग  द्यायला सुरुवात केली. ही ट्रेनिंग झाल्यावर  दोन तास मैदानातच बॉडी वेट वर्कआऊट होत असे. या सगळय़ाचा परिणाम म्हणजेच आता संग्रामच्या शरीराला प्रॉपर बॉडी पोश्चर आलं होतं आणि हळूहळू का होईना पण व्यायामाची आवडसुद्धा निर्माण झाली. मग काही काळानंतर संग्रामने अंधेरी येथे ऍथलेटिक्स शिकायला सुरुवात केली. तेथे 10 किमी. धावणे, सायकलिंग, पोहणे असे व्यायामाचे सेशन होते. इथे लागलेली सायकलिंगची सवय संग्रामनी अजूनही मोडली नाही. आजही तो नियमितपणे 45 मिनिटं सायकलिंग आवर्जून करतो,पण अजूनही संग्रामची गोड खाण्याची सवय जाता जात नव्हती आणि अशा वेळी त्याच्या आयुष्यात ‘ब्रेव्ह हार्ट’ नावाचा सिनेमा आला. या सिनेमात संग्रामच्या व्यक्तिरेखेचा एक एक अवयव निकामी होत जातो आणि चित्रपटाच्या शेवटी ती व्यक्तिरेखा मरण पावते, अशी भूमिका त्याला सादर करायची होती. यासाठी त्याला चित्रपटाच्या सुरुवातीला हेल्दी आणि जशी कथा पुढे सरकेल तसं स्वतःचं वजन कमी करायचं होतं. यासाठी गोड पदार्थांना बॉयकॉट करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. भूमिकेच्या शेवटच्या क्षणांसाठीच्या चित्रीकरणासाठी संग्राम पंधरा दिवस लिक्विड डाएटवर होता. याची तयारी हळूहळू सुरू झाली होती. म्हणजे आधी जेवणातून भात वगळणं, मग काही दिवसांनी 3 पोळ्यांवरून 2 वर येणं, मग 2 वरून 1, मग नुसतं बॉईल वेज फूड आणि मग पंधरा दिवसांचं लिक्विड डाएट अर्थात कडधान्याचं पाणी किंवा कडधान्यांचे ज्यूस म्हणूया आणि भूमिका संपल्यावर नॉर्मल जेवणासाठीसुद्धा वरचीच प्रक्रिया पण रिव्हर्सेबल ऑर्डरमध्ये या भूमिकेचा फायदा म्हणजेच गोड खाण्यावर कंट्रोल आला, शिवाय वजन नियंत्रणात कसं ठेवता येईल याचीसुद्धा त्याला जाणीव झाली आणि म्हणूनच सेटवर पिझ्झा, चायनीज जरी खाल्लं तरी संध्याकाळी बॉईल व्हेजिटेबल्स खाऊन आहार बॅलेन्स कसा करायचा हे त्याला चांगलंच माहिती आहे. बरेच वेळा संध्याकाळी 7 नंतर तो काही खात नाही. केटो डाएट, ओट्स खाण्यामध्ये संग्रामला अजिबात रस नाही. त्यापेक्षा पोहे, शिरा, उपमा असे घरचे पदार्थ खाण्यात त्याला जास्त रस आहे. तुम्हाला हा लेख आवडला असेल, अशी आशा करतो. भेटूया पुढच्या शनिवारी एका नवीन सेलिब्रिटीसह!

– [email protected]