
उरण येथील सीएनजी पंप चालकांच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त झालेल्या काही संतप्त रिक्षाचालकांनी पंपावर हल्लाबोल करीत कर्मचाऱ्यांना मारहाण केली. यामुळे सीएनजी चालकाने घेतलेल्या पंप बंद करण्याच्या ताठर भुमिकेनंतर उरणमधील काही संघटनांनी शुक्रवारी तीन तास रिक्षा बंद ठेवून निषेध व्यक्त केला. यामुळे मात्र प्रवाशांची बंद दरम्यान गैरसोय झाली.
उरण तालुक्यातील हजारो सीएनजी वाहनांसाठी फुंडे येथील एकच खासगी पंप आहे.एकच सीएनजी पंप असलेल्या पंपावर दररोज मोठी रांग असते.मध्येच कधी वीजपुरवठा खंडित होतो तर कधी सीएनजी गॅसच संपल्याचा प्रकार घडतो. त्यामुळे मात्र तासनतास रांगेत उभे राहूनही जर वाहन चालकांना सीएनजी गॅस उपलब्ध न झाल्यास वाहन चालक विशेषतः रिक्षा चालक आणि पंप चालकांमध्ये नेहमीच वादाची ठिणगी पडते. हे नित्याचेच झाले आहे.
गुरुवारी असाच काहीसा प्रकार घडला आणि तासनतास रांगेत राहूनही गॅस उपलब्ध होत नसल्याने संतप्त झालेल्या काही रिक्षाचालक पंप चालक आणि कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार जुंपली. बाचाबाची,शिवीगाळीनंतर प्रकरण हातघाईवर आले. त्यामुळे काही रिक्षाचालकांनी पंप चालकाला मारहाण केली.पंपाच्या काचा फोडल्या.या घटनेमुळे पंप चालकाने पंपच बंद केला. सीएनजी पंप चालकाच्या मनमानी कारभाराचा सर्वच रिक्षा चालकांना बसला. यामुळे संतप्त झालेल्या रिक्षा चालकांनीही पंप चालकाने चालविलेल्या मनमानी कारभाराविरोधात रिक्षा बंदचे हत्यार उपसले. त्यामुळे उरण शहर व परिसरातील 2500 रिक्शाचालकांनी बंद पाळून निषेध व्यक्त केला. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल उर्फ अण्णा पुरोगामी यांनी दिली.
दरम्यान सीएनजी पंप डिलर गौतम कूटे यांनीही काही अज्ञात रिक्षा चालकांनी नाहक मारहाण करून पंपाची नासधूस केली असल्याचे सांगितले. याप्रकरणी
पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. दररोज 5-6 गाड्याने सीएनजी पुरवठा केला जातो. मात्र उरण परिसरातील दररोजच्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे कधी कधी दोन-तीनच गॅसच्या गाड्या उपलब्ध होतात. तर कधी वीज प्रवाह खंडित होतो. या कारणांमुळे वाहनांना सीएनजी उपलब्ध करून देण्यात अडचणी निर्माण होतात. मात्र वाहन चालकांकडून सहकार्याची अपेक्षा असताना चालकांकडून अडचणी समजून घेतल्या जात नाहीत. अशी खंतही गौतम कूटे यांनी शेवटी व्यक्त केली. दरम्यान सीएनजी पंप आणि रिक्षा वाहतूक पुर्ववत सुरू झाली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहिती उरण वरिष्ट पोलीस निरिक्षक जगदिश कुलकर्णी यांनी दिली.























































