तृतीय पंथीयांकडून दोन शाळकरी मुलांचा अपहरणाचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुरुडजवळच्या एकदरा गावातील सर एस . ए . हायस्कूलमध्ये पाचवीत शिकणारे दोन विद्यार्थी सकाळी सात वाजल्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे शाळेत जात होते. त्यावेळी शाळेच्या रोडवर आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या मारूती व्हॅनमधtन साडी नेसलेल्या तृतीय पंथीयांनी या बालकांच्या तोंडावर हात ठेवत त्यांना पळवण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकाराबाबत शाळेच्या मुख्याध्यापक यांनी मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

दोन शाळकरी मुलांना तृतीयपंथी पळवून नेत असताना त्यांची गाडी मुरुड शहरातील कोटेश्वरी मंदिरपर्यंत आली असता यातील एका विद्यार्थ्याने तृतीयपंथीयाच्या हाताला कडाडून चावा घेतला व वाचवा – वाचावा अशी आरडाओरड केली. सकाळची वेळ असल्याने मुरुडमधील नागरिक मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडले होते. समोरून येणाऱ्या व्हॅनसमोर नागरिक आले असता आपल्याला पकडण्यासाठी आले असल्याचा संशय घेऊन अपहरणकर्त्यांनी तातडीने व्हॅनचा दरवाजा उघडून या दोन्ही मुलांना गाडीच्या बाहेर ढकलून गाडी अलिबागच्या दिशेने भरधाव पळवल्याचे समजते. दोन्ही मुलांनी रडत – रडत घर गाठून आपल्या आई – वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. या घटनेची शहानिशा करण्यासाठी पालकांनी मोठ्या संख्येने हायस्कूलकडे धाव घेतली. त्यांनी घडलेला प्रकार प्रशासनाला सांगितला. सर एस. ए. हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मुरुड पोलिसांनी शहरातील काही भागात गस्त घालावी अशी मागणी यावेळी पालकांनी केली आहे. मुरुड पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी मेघना धायगुडे यांना झालेल्या प्रकाराबाबत कल्पना दिली असता त्यांनी सांगितले की, सर्व केंद्र प्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत की, शालेय मुलांनी अनोळखी व्यक्तीकडून कोणत्याही वाहनांची मदत घेऊ नये. त्याच प्रकारे कोणी चॉकलेट अथवा अन्य वस्तू घेऊ नयेत अशा सूचना देण्यात आल्याचे सांगितले.

मुरुड येथे झालेल्या प्रकारची माहिती आम्ही घेत आहोत. ज्या मुलांच्या बाबतीत हा प्रकार घडला त्यांच्या पालकांनी कोणतीही तक्रार दिलेली नाही. मात्र शाळेच्या मुख्याध्यापक यांनी याबाबत अर्ज केला आहे. याबाबत चौकशी करून योग्य तो तपस केला जाईल असे रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी सांगितले.