
>> प्रसाद शिरगावकर
बुद्धिमान यंत्रं, स्मार्ट शस्त्रं ही आपल्या नियंत्रणाबाहेर जाऊन, आपल्यापेक्षा वरचढ होऊन आपल्यावर अधिपत्य गाजवतील का? पृथ्वीवर यंत्रांचं राज्य येईल का? हे सध्याच्या काळात चर्चिले जाणारे कळीचे प्रश्न . या प्रश्नांचा वेध घेताना एका चिंताजनक भविष्याने आपण नक्कीच वेढले जातो.
कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आणि यंत्रमानवांची निर्मिती (Robotics) या क्षेत्रामध्ये सध्या जगभर खूप मोठय़ा प्रमाणावर संशोधन होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली अनेक प्रकारचं यंत्रं आणि उपकरणं तयार होत आहेत. विविध क्षेत्रांमध्ये त्यांचा वापर सुरू होतो आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये होणारी प्रगती आणि यंत्रमानव करू शकत असलेल्या कामांची व्याप्ती कल्पनातीत वेगाने वाढत आहे. ही कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या यंत्रमानवांनी (वा उपकरणांनी) गजबजलेल्या युगाची सुरुवात होत आहे का अशी शक्यता सध्या दिसत आहे.
याचबरोबर ‘यंत्रे माणसांहून वरचढ ठरतील का?’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली यंत्रे आपल्यावर वर्चस्व गाजवून राज्य करतील का?’ असे प्रश्न वर्षानुवर्षे आपल्याला पडत आले आहेत. चीनमध्ये नुकत्याच झालेल्या जागतिक कृतिम बुद्धिमत्ता परिषदेमध्ये अलिबाबा डॉट कॉमचे सर्वेसर्वा जॅक मा आणि स्पेसेक्सचे संस्थापक एलॉन मस्क या दोन तंत्रज्ञान व्यवसायातल्या जागतिक नेत्यांमध्ये या विषयावर वाद झाला. यानिमित्ताने हे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. या प्रश्नांच्या उत्तरांचा मागोवा घेण्याचा हा एक प्रयत्न.
दोनेकशे वर्षांपूर्वी घडलेल्या औद्योगिक क्रांतीनंतर आपण आपली अनेक शारीरिक कष्टांची कामे करण्यासाठी ऊर्जेवर चालणाऱया यंत्रांचा शोध लावला. शेतांपासून ते कारखान्यांपर्यंत आणि घरांपासून ते कचेऱयांपर्यंत सर्व ठिकाणी आपली शारीरिक कष्टाची कामं करण्यासाठी आपण अगणित यंत्रे तयार केली. त्या यंत्रांमुळे आपलं आयुष्य, जीवनशैली आणि आपलं समाजजीवन आमूलाग्र बदललं. औद्योगिक क्रांतीमुळे तयार झालेली यंत्रे ही अत्यंत ताकदवान, पण बुद्धिहीन होती. अत्यंत कष्टाची आणि कौशल्याचीही कामं झपाटय़ानं आणि सातत्यानं करणं हे त्यांचं वैशिष्टय़ होतं. पण ती यंत्रं चालवण्यासाठी, ऑपरेट करण्यासाठी माणसंच लागायची. माणसांची बुद्धिमत्ता आणि निर्णयक्षमता आणि यंत्रांची कष्ट करण्याची क्षमता अशी भागिदारी गेली दोनशे वर्षे सुरू होती.
मात्र, गेल्या पन्नासेक वर्षांमध्ये झालेल्या (आणि अजूनही होत असलेल्या) डिजिटल क्रांतीनंतर यंत्रांना विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमताही आपण देऊ करत आहोत. शारीरिक कष्टांनंतर आता बौद्धिक कष्ट करण्याचं कामही आपण यंत्रांवर सोपवायला लागलो आहोत. या बदलाचेही अनेक दूरगामी परिणाम आपल्या जीवनशैलीवर आणि समाजजीवनावर होणार आहेत. अर्थातच, या क्रांतीमुळे काही अत्यंत सकारात्मक आणि स्वागतार्ह बदल होऊ शकतील. उदाहरणार्थ, मूलभूत मानवी प्रतिष्ठेमध्ये बसत नाहीत अशी गटारं साफ करण्यासारखी कामं करणारी स्वयंचलित, बुद्धिमान यंत्रं अशा कामांपासून आपल्याला मुक्त करतील. स्वप्रशासित वाहनांमुळे (autonomous vehicles) अधिक सुरक्षित आणि अपघातविरहित प्रवास शक्य होईल.
कारखान्यांमधली, बांधकामं करतानाची काही अत्यंत जोखमीची आणि जिवावर बेतू शकणारी कामं बुद्धिमान पद्धतीनं करणारी यंत्रं कामगारांचं आयुष्य अधिक सुकर आणि सुरक्षित करतील. स्मार्ट घरं, स्मार्ट उपकरणं, स्मार्ट वाहनं, स्मार्ट कारखाने या साऱयांमुळे रोजच्या आयुष्यातल्या अनेक किचकट, क्लिष्ट, विचार करायला लागणाऱया आणि निर्णयांमध्ये चूक होण्याची शक्यता असलेल्या गोष्टींपासून आपण मोकळे होऊ. मात्र या क्रांतीमुळे दोन मोठे नकारात्मक बदल होणंही शक्य आहे. औद्योगिक क्रांतीनंतर शारीरिक कष्ट कमी झाले, बैठी कामं करण्याची जीवशैली वाढली आणि त्याचा थेट परिणाम म्हणून लठ्ठपणा आणि त्यातून निर्माण होणाऱया शारीरिक आजारांचं प्रमाण वाढलं. तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्रांतीनंतर आपण अनेक प्रकारची बौद्धिक कामं बंद करणार आहोत, काही खूप कमी करणार आहोत. याचा आपल्या बुद्धिमत्तेवर परिणाम होईलच. कसा आणि काय होईल हे आज सांगता येणं अवघड आहे. नजीकच्या भूतकाळातली उदाहरणं घ्यायची तर कॅल्क्युलेटर वापरायला लागल्यापासून तोंडी आणि मनातल्या मनात गणितं करण्याची आपली क्षमता झपाटय़ानं कमी झाली. कॉम्प्युटरवरची सॉफ्टवेअर्स वापरायला लागल्यापासून गणितातली किचकट सूत्रं लक्षात ठेवून अवघड गणितं सोडवू शकण्याची आपली क्षमता कमी झाली. मोबाईल फोन आल्यापासून तर इतरांचे फोन नंबर लक्षात ठेवण्याचीही आपली क्षमता जवळपास नाहीशी झाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्रांतीनंतर आपण बुद्धिमान यंत्रं आणि उपकरणांच्या गराडय़ात असलेली मठ्ठ माणसं होऊ का? हा चिंताजनक प्रश्न आहे.
दुसरा महत्त्वाचा नकारात्मक बदल माणसातल्या अंगभूत हिंसकतेमुळे होणार आहे. आपण स्मार्ट यंत्रं आणि उपकरणं तयार करतो आहोत तशीच स्मार्ट, बुद्धिमान आणि स्वप्रशासित शस्त्रास्त्रंही तयार करतो आहोत. मानवविरहित ड्रोन्स आणि स्वयंचलित क्षेपणास्त्रं ही स्मार्ट हिंसक शस्त्रांची सुरुवात आहे. शेकडो मैल दूर जाऊन हजारो जणांचे प्राण घेणं, गावंच्या गावं उद्ध्वस्त करणं ही कामं ही स्मार्ट शस्त्रं लीलया करू शकतात. याच्या पुढे जाऊन अत्यंत स्पेसिफिक टार्गेट शोधून ते उद्ध्वस्त करू शकणारी शस्त्रं किंवा विशिष्ट व्यक्तीचा माग काढून हल्ला करू शकणारे ड्रोन्स तयार होणं हे अगदीच अशक्य नाही. अशी शस्त्रास्त्रं आणि तंत्रज्ञान चुकीच्या लोकांच्या हातात पडलं तर काय होईल याची कल्पनाही करता येत नाही (सौदी अरेबियाच्या तेल विहिरीवर येमेनमधून केला गेलेला ड्रोन हल्ला हे अगदी काल-परवाचं उदाहरण आहे). अर्थात, स्मार्ट शस्त्रांमध्ये स्वतःची निर्णयक्षमता असू नये आणि यंत्रमानवांमध्ये माणसाला इजा पोहोवण्याचं ‘कोडिंग’ असू नये असा सध्याचा जगभरातल्या देशांनी मान्य केलेला नियम आहे, पण आपल्या सत्तालालसेपोटी असे नियम पायदळी तुडवणारी माणसंही असू शकतात हा आपला इतिहास आहे.
अशी बुद्धिमान यंत्रं आणि स्मार्ट शस्त्रं ही आपल्या नियंत्रणाबाहेर जाऊन, आपल्यापेक्षा वरचढ होऊन आपल्यावर अधिपत्य गाजवतील का? पृथ्वीवर यंत्रांचं राज्य येईल का? हे सध्याच्या काळात चर्चिले जाणारे कळीचे प्रश्न आहेत. मात्र या दोन्हीचं उत्तर मला ‘नाही, असं घडणार नाही’ असं वाटतं. याची दोन मुख्य कारणं आहेत. मानवावर अधिपत्य आणि पृथ्वीवर राज्य करायचं तर जगातल्या सर्व बुद्धिमान यंत्रांनी एकत्र येऊन एक सामाईक उद्दिष्ट ठरवावं लागेल. हे करण्यासाठी आवश्यक असलेलं आत्मभान आणि समाजभान त्यांच्यापाशी नाही. यंत्रांना आपण यंत्र आहोत आणि ‘आपल्या’सारखी इतरही यंत्रं आहेत आणि ‘आपण’ एकत्र आलं पाहिजे असं सजिवांसारखं भान असण्याची प्रणाली सध्या अस्तित्वात नाही आणि निर्माण होण्याची शक्यताही शून्य आहे. तसंच ही यंत्रं बुद्धिमान आहेत, अधिकाधिक बुद्धिमान होत आहेत, पण त्यांना भावना नाहीत. अधिपत्य गाजवणं, नियंत्रण करणं, राज्य करणं इत्यादी कृती या राग, लोभ, द्वेष, मत्सर, भीती या मूलभूत मानवी भावनांपोटी केल्या जातात. या मूलभूत भावना आणि त्यातून निर्माण होणारी सत्तेची लालसा आणि महत्त्वाकांक्षा हे सारं यंत्रांजवळ नसल्याने यंत्रांचं राज्य वगैरे येण्याची नजीकच्या भविष्यकाळात काहीही शक्यता नाही.
माणसापेक्षा वरचढ झालेली, आपल्या नियंत्रणाबाहेर गेलेली आणि आपल्यावर अधिपत्य गाजवण्याचा प्रयत्न करणारी यंत्रे हा ‘सायन्स फिक्शन’चा अत्यंत लाडका विषय आहे. या विषयावरच्या शेकडो कथा, कादंबऱया आणि चित्रपट गेल्या शंभरेक वर्षांत आपण पाहिले आहेत. अर्थात हे फक्त सायन्स फिक्शन नाही, तर अफाट ताकद असलेली, प्रचंड क्षमतेची एखादी गोष्ट आपणच निर्माण करणे आणि नंतर ती नियंत्रणाबाहेर जाऊन आपल्याच जिवावर उठणे ही माणसाच्या बाबतीत युगानुयुगे घडत असलेली ‘भस्मासुराची’ गोष्ट आहे. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्तेने काबीज केलेला समाज हे निव्वळ एक ‘फिक्शन’च राहण्याची शक्यता आहे.
(लेखक मुक्तस्रोत तंत्रज्ञानामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे प्रशिक्षक आणि वत्ते आहेत़ )






























































