मांडवा ते गेटवे बोटसेवा सुरू; प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळ्यात चार महिने बंद असलेली मांडवा ते गेटवे जलवाहतूक बोटसेवा सोमवारपासून सुरू झाली आहे. सध्या सुरू झालेली ही बोटसेवा अर्धवेळ असून हवामानाच्या अंदाजानुसार सुरू राहणार आहे. पाऊस अद्यापही सुरू असल्याने यावेळी मांडवा गेटवे जलवाहतूक सेवा उशिरा सुरू झाली आहे. जलवाहतूक सेवा सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

जून महिन्यात पावसाळा सुरू होण्याआधी मांडवा ते गेटवे ही बोटसेवा पावसाळ्यातील हवामानामुळे चार महिने बंद केली जाते. त्यामुळे अलिबागकडे येणाऱ्या मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांना खड्डेमय रस्त्याने प्रवास करावा लागतो. पर्यटनास येणाऱ्या पर्यटकांनाही हा जलवाहतूक प्रवास सुलभ आणि सोपा असतो. सोमवारपासून ही जलवाहतूक बोटसेवा सुरू झाल्याने प्रवाशामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. दरवर्षी ही बोटसेवा 1 ते 5 सप्टेंबरपर्यंत म्हणजे गणपती सणाला सुरू होते. मात्र यावेळी पावसाने अजून आपली सुट्टी वाढवल्याने बोट सेवा सुरू होण्यास उशीर झाला आहे. मांडवा ते गेटवे जलवाहतूक बोटसेवा सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये आनंद असला तरी बोटसेवा कंपन्यांनी तिकीट दरात 5 रुपयांची वाढही केली आहे. तर अजूनही पावसाळी वातावरण असल्याने बोटसेवा अर्धवेळ सुरू राहणार आहे.