
अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. आता आपली उरलीसुरली पत वाचवण्यासाठी त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवू नये असा सल्ला मंत्री विनोद तावडे यांनी दिला आहे. तसेच राज्यात कुठल्याही मतदारसंघात उभे राहिले तरी ते हरतील अशी तावडे म्हणाले. नांदेड विभागातील भाजपच्या मीडिया वॉर रुमच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
राज्यात शिवसेना-भाजपा युती होणारच असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त करुन जागा वाटपाचा तिढा दोन दिवसात सुटेल. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. गेल्या पाच वर्षात सरकारने केलेल्या कामाची पावती लोकसभेप्रमाणेच यावेळीही मिळणार त्यामुळे गतवेळेस पेक्षा जास्त जागा महायुतीला मिळतील. काँग्रेस व राष्ट्रवादीची अवस्था केविलवाणी झाली असून, वंचित बहुजन आघाडी हा आगामी विरोधी पक्ष असेल. या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची त्यांच्याच जिल्ह्यात वाताहत झाली. आता त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवू नये, आणि आपली उरली सुरली पत घालवू नये, असा सल्ला आपण देत आहोत, असेही तावडे म्हणाले. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघापैकी कुठल्याही मतदारसंघात उभे राहिले तरी ते पराभूतच होतील, असे भाकीतही तावडे यांनी केले. लोकसभेच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे मतदारांनी महायुतीवर विश्वास दाखविला त्यापेक्षाही या निवडणुकीत मतदार महायुतीसोबत असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वक्फ बोर्डाच्या अनेक जमिनी अनेकांनी हडप केल्याची माहिती पुढे येत असून, याचा आपण सखोल अभ्यास करत आहोत. सबळ पुरावे आणि माहिती समोर आल्यानंतर याबाबत पुढील कारवाई करु, असेही तावडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.



























































