
चारित्र्याच्या संशयावरून वाद विकोपाला जाऊन पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना चिंदर सडेवाडी येथे घडली आहे. अनुराधा अमित मुळे (28) हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपी अमित दत्तात्रय मुळे (30) याने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली.
अनुराधा हिचा भाऊ लक्ष्मण मनोहर घाडीगांवकर याने आचरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, अनुराधा आणि अमितचा 9 वर्षापुर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन वर्षाचा मुलगा आहे. आठ दिवसांपूर्वी बहिण त्रिंबकला माहेरी आली होती तेव्हा चारित्र्याच्या संशयावरून पती आपल्याशी भांडण करत असल्याचे सांगितले होते. यानंतर गुरुवारी दुपारी झालेल्या वादात वाद विकोपाला जाऊन आरोपी अमित मुळे याने रागाच्या भरात पत्नी अनुराधाचा गळा दाबून खून झाला.
यानंतर घाबरलेल्या अमितने आपल्या भावाला पत्नी निपचित पडली असल्याचे सांगितले. अमितच्या भाऊ आणि भावजयने अनुराधा बेशुद्ध झाली असेल असू समजून तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले होते. परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. याची माहिती मिळताच वाहतूक पोलीस कर्मचारी विनायक साटम त्यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित घटनेची माहिती घेतली. यावेळी तपासासाठी आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक जे. एच. कळेकर यांनी आरोपीला प्राथमिक आरोग्य केंद्र येथून ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस करत आहेत.



























































