
मुंबईतील पवई येथे 1 ऑक्टोबरपासून जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रतिष्ठsच्या स्पर्धेत जगभरातील 66 देशांमधील जवळपास 700 हून अधिक खेळाडूंचा सहभाग असणार आहे. यामध्ये सहा खेळाडू जागतिक विजेते असून याप्रसंगी तीन ग्रॅण्डमास्टर्सही आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. हिंदुस्थानचे नेतृत्व युवा ग्रॅण्डमास्टर प्रग्नानंधा आर. याच्यावर असणार आहे. तसेच सहा गटांमध्ये जगभरातील युवा खेळाडू जेतेपदासाठी सर्वस्व पणाला लावतील.
जागतिक स्तरावरील अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी ही स्पर्धा 14, 16 व 18 वर्षांखालील मुले व मुलींच्या गटात खेळवली जाणार आहे. त्यामुळे सहा गटांत खेळाडूंना अजिंक्य होण्याची संधी लाभणार आहे. अखिल हिंदुस्थानी बुद्धिबळ महासंघाच्या मान्यतेने आणि अखिल मराठी बुद्धिबळ संघटनेकडून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये यजमान हिंदुस्थानसह रशिया, अमेरिका, फ्रान्स, इटली आणि अझरबैझान यांच्यासह इतर देशांतील खेळाडूही आपल्या खेळाची चमक दाखवणार आहेत.



























































