माध्यमे बदलली; आवाज कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप ठाकूर

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या गायनाचा प्रवास निरंतर सुरू आहे. निरव शांततेच्या एकेकाळच्या वातावरणातून आजच्या वाढलेल्या गोंगाटापर्यंत लतादीदींच्या गायन प्रवासाला अडथळा आला नाही. राजकारण, अर्थकारण यात केवढी तरी स्थित्यंतरे झाली, माध्यमे बदलली, पण एकच गोष्ट लौकिकाने स्थिर राहिली, ती म्हणजे लतादीदींचा आवाज…

स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या देशात उत्साहाचे वातावरण असतानाच आशावाद आणि स्वप्नाळू वातावरण होते. पन्नास व साठच्या दशकात चित्रपट गीते जनसामान्यांपर्यंत पोहचण्याची माध्यमे कोणती होती? तर उच्चभ्रू वर्गात ग्रामोफोन होता. तो घरी असणे प्रतिष्ठsचे मानले जाई, मध्यमवर्गीय कुटुंबात रेडिओ आणल्यावर चक्क साखर अथवा गूळ वाटला जाई. निम्नवर्गीय समाज लग्न, बारसे, सत्यनारायणाची पूजा अशा वेळी लाऊडस्पीकर ऐके. यात रेडिओ अथवा ट्रान्झिस्टरवर मुंबई आकाशवाणीवर मराठी गाणी, विविध भारतीवर जुनी वा नवीन गाणी, रेडिओ सिलोनवरील ‘बिनाका गीतमाला’ यावर गाणी ऐकण्याची हौस-मौज पूर्ण करे. प्रत्येक गाणे अगदी तत्परतेने ऐकले जाई. त्यासह गुणगुणले जाई. शहरातील इराणी हॉटेलमध्ये त्या काळात ज्यूक बॉक्स असत. त्यात चार आण्याचे नाणे टाकून आपल्या आवडते गाणे ऐकायचे. आपले गाणे येईपर्यंत इतरही गाणी ऐकायला मिळत. तात्पर्य, रसिकांपर्यंत गाणे पोहचण्याची माध्यमे मोजकी असूनही त्या काळात चित्रपट गीते, गैरफिल्मी गीते लोकप्रिय झाली. लता मंगेशकर यांच्या गायनाचा प्रवास अशाच माध्यमातून होत राहिला.

सत्तरच्या दशकात दूरदर्शन (मुंबईत 2 ऑक्टोबर 1972 रोजी), टेपरेकॉर्ड अशी माध्यमे आली आणि सिनेसंगीताचा विस्तार होत गेला. हळूहळू शहरीकरण वाढत गेले. समाजात ‘जुनी गाणी चांगली’ अशी मानसिकता मूळ धरू लागली. आज तुम्ही जर साठी सत्तरीपार चित्रपट संगीत शौकिनांकडे यावर गप्पा केल्या तर लक्षात येईल की ते साधारण 1965- 70 या काळापर्यंतचे चित्रपट संगीत श्रवणीय आहे. हा लता मंगेशकर यांच्या गायनाचा सुवर्णकाळ म्हटला जातो. याच टप्प्यावर हिंदी चित्रपटाची आणि त्याच्या गीत संगीताची संस्कृती बदलत होती. पण त्या बदलातही लतादीदींच्या स्थानाला कसालाही धक्का लागला नाही. ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला रंगीत दूरदर्शन व व्हिडीओचे आपल्याकडे आगमन झाले (1982). याच काळात टेपरेकॉर्डची ध्वनिफीत अवघ्या पंधरा रुपयांत उपलब्ध होऊ लागल्याने चित्रपट संगीताचा प्रसार सोपा आणि वेगाने झाला, पण त्याच वेळी रिमिक्स प्रकार, जुनी गाणी नवीन आवाजात याचाही सुकाळ झाला. लतादीदींच्या अनेक उत्तम गाण्यांना नवीन आवाजात ‘बाजारात’ आणले गेले, पण त्याला लतादीदींच्या सूर, लय, ताल यांची सर येणे शक्यच नव्हते. यावर तेव्हापासून त्या आपली नाराजी व्यक्त करीत आहेत. नव्वदच्या दशकात जागतिकीकरणाच्या काळात उपग्रह वाहिनीच्या आगमनाने माहिती आणि मनोरंजनाचा स्फोट झाला. घराघरात रंगीत दूरचित्रवाणी, त्यावर चोवीस तास मनोरंजन अथवा बातमी देत असलेल्या उपग्रह वाहिन्या यांच्या वाटचालीत लतादीदींच्या असंख्य गाण्यांना स्थान कायम होते. मोबाईल क्रांती झाली आणि रिंगटोन व कॉलरटय़ून यातूनही लतादीदींची गाणी नवीन पिढीतही लोकप्रिय झाली. एव्हाना एकपडदा थिएटर्सचा जमाना मागे पडून मल्टीप्लेक्स युग आले.

लतादीदींच्या गायनाचा प्रवास असा चौफेर आहे. लतादीदी मोठय़ा सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अशा बदलाच्या साथीदार, साक्षीदार आहेत. त्यांनी हजारो गाणी गायली. अनेक किती गीतकार, संगीतकारांकडे गायन केले. कालानुरूप माध्यमे बदलली, ‘आभासी वास्तवा’चे युगही आले, मात्र या स्थित्यंतरांमध्ये एकच गोष्ट कायम राहिली ती म्हणजे लतादीदींचा आवाज! तो जसा होता तसाच कायम राहिला आहे.