
उशिरा का होईना, पण अखेर फेसबुकला शहाणपण सुचले आणि त्यांनी नुकतीच फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवरून हजारो ऍप्स उडवून लावली आहेत. फेसबुकच्या अटी व नियमांचे पालन न करणे, यूजर्सच्या खासगी माहितीचा गैरवापर करणे अशा विविध कारणांसाठी या ऍप्सना फेसबुकने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. 400 वेगवेगळ्या डेव्हलपर्सच्या ऍप्सचा यामध्ये समावेश आहे. सोशल मीडिया जायंट म्हणून लौकिक असलेल्या फेसबुकला डाटा लीक अर्थात केंब्रिज ऍनालिटिका प्रकरणात जगभरच निंदेला आणि कायद्याच्या विळख्यांनाही सामोरे जावे लागले आहे. अनेक मोठय़ा सेलिब्रेटीज आणि जगभरातील अनेक यूजर्सनी यानंतर आपण फेसबुकचा वापर बंद केल्याचे जाहीरपणे सांगितले होते. अशातच फेसबुकच्या शेअर्सचीदेखील बाजारात घसरण चालू झाली आणि फेसबुकच्या अडचणीत अजूनच भर पडली. शेवटी यातून काही धडा घेत फेसबुकने आपल्या प्लॅटफॉर्मवरती कार्यरत असलेल्या सर्वच ऍप्सची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी ‘APP DEVELOPER INVESTIGATION’ हा कार्यक्रमदेखील राबविला. याच संशोधनात जी ऍप्स गैरकारभार करताना आढळली त्यांच्यावर फेसबुकने बंदी आणली आहे. यावेळी लाखो ऍप्सची चाचणी करण्यात आल्याचे आणि यापुढेदेखील ही चाचणी चालू राहण्याचे फेसबुकने नमूद केले आहे. या बंदी घातलेल्या काही ऍप्समध्ये ‘टेस्टिंग’ चालू असलेल्या काही ऍप्सचादेखील समावेश आहे हे विशेष. यावेळी फेसबुकने बंदी घातलेल्या काही ऍप्सची उदाहरणे देऊन बंदीची कारणेदेखील स्पष्ट केली आहेत. ‘myPersonality’ सारखे ऍप हे यूजर्सच्या खासगी माहितीला रिसर्चर आणि इतर खासगी कंपन्यांशी शेअर करत होते, अथवा ही माहिती सार्वजनिकदेखील करत होते. त्यामुळे या ऍपवर बंदी घालण्यात आली. अशा ऍप्सवरती बंदी बरोबरच यातील काही डेव्हलपर्सवरती फेसबुकने कायद्याचा बडगादेखील उगारला आहे. साऊथ कोरिअन कंपनी ‘Rankwave’ वरती चाचणीच्या वेळी सहकार्य न दिल्याबद्दल केस करण्यात आली आहे. तर LionMobi आणि JediMobi सारख्या कंपन्यांवरती यूजर्सच्या मोबाईलला धोका उत्पन्न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.





























































