परळी वैजनाथ- कालरात्री, डोंगर तुकाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवरात्रोत्सव एक दिवसावर येऊन ठेपला आहे. मात्र परळीतल्या कालरात्री मंदिर आणि अंबा आरोग्य भवानी माता मंदिर डोंगर तुकाईकडे जाणाऱ्या रस्त्याचे प्रचंड हाल झालेले आहेत. काही ठिकाणी प्रशासनाकडून नावापुरतीच डागडुजी केली जात आहे, तर काही मार्गावर खड्डेच खड्डे झालेले आहेत. एकंदरीत नवरात्र महोत्सवात भक्तांचा दर्शनाचा मार्ग खडतर झालेला दिसत आहे.

शहरातल्या अतिप्राचीन अशा कालरात्री मंदिराकडे जाणाऱ्या आणि सावता माळी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला अक्षरशः चाळण लागली आहे. थोडाही पाऊस झाला की खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. कालरात्री मंदिर समोरही काही ठिकाणी रस्त्याला खड्डे पडलेले आहेत. नवरात्रोत्सवासाठी हजारो भाविक कालरात्री देवीच्या दर्शनाकरता येत असतात. मात्र असे असतानाही या रस्त्याची डागडुजीही करण्यात आलेली नाही.

परळी-चांदापूर मार्गावर असलेल्या अंबाआरोग्य भवानी माता मंदिरात जाण्यासाठी असलेला रस्ता अक्षरात खड्ड्यांनी भरून गेला आहे.रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता हेच समजायला मार्ग नाही. मुरूम टाकून या रस्त्याची डागडुजी केली जात आहे. विशेष म्हणजे नवरात्रीच्या सात दिवस आपले विविध आजार दूर करण्यासाठी भाविक डोंगर तुकाईच्या पायी वाऱ्या करत असतात. असे असतानाही या रस्त्याकडे दुर्लक्ष केलेले असल्याने भाविकांची मोठी नाराजी दिसून येत आहे. दरम्यान या रस्त्यावर पायी वारी करायची की नाही, असा प्रश्न आता भाविकांना पडला आहे.