सोमठाणा येथे रेणुका देवी मंदिरात नवरात्रौत्सवास प्रारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना-संभाजीनगर जिल्ह्यासह बदनापूर तालुक्याचे कुलदैवत असलेल्या सोमठाणा येथील रेणुका देवीमंदिरात नवरात्रौत्सवास रविवारपासून प्राऱंभ झाला आहे. रविवारी येथे घटस्थापना करण्यात आली. मंदिरात नवरात्रौत्सवा निमित्त नऊ दिवस हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. देवीची अखंड सेवा करण्यासाठी भाविकांनी मंदिर परिसरात राहुट्या उभारल्या आहेत. त्यामुळे सगळीकडे भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

जालना, संभाजीनगर जिल्ह्यातील कुलदैवत असलेले बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथे नवरात्रानिमित्त दरवर्षी लाखो भाविक येतात.  नवसाला पावणारी देवी म्हणून व माहुर येथील रेणुका देवीचे प्रतिपीठ म्हणून येथील रेणुका माता ओळखली जाते. या यात्रेसाठी गडावर संस्थानच्या वतीने मोठया प्रमाणात सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नवरात्रातील सातव्या माळेला येथे मोठी यात्रा भरते. जवळपास 50 ते 60 हजार भाविक भक्त या दिवशी सोमठाणा येथे दर्शनाला येत असतात.

सोमठाणा येथील निसर्गाच्या कुशीत डोंगरावर रेणुकादेवीचे मंदिर आहे. परिसरातील वृध्द भाविकांच्या मते देवी येथे स्वयं निर्माण झाली आहे.  सतयुगात महादेव व पार्वती गमन करण्यासाठी या डोंगरावर आले असता पार्वतीला हा परिसर आवडल्याने त्यांनी येथेच वास्तव्य करण्याचा हट्ट धरला.

सोमठाणा येथील डोंगरावरच स्वयंभू होऊन स्थिरावले. रेणुकामाता हे पार्वतीचेच रूप आहे, असे मानले जाते. रेणुका माता मंदिराच्या पायथ्याशीच महादेव मंदिर असून येथील पिंड प्राचीन आहे. काही भाविकांच्या मते साक्षात ब्रम्हदेवाने माता रेणुकेची स्थापना केलेली असून याचे वर्णन रामायणात आलेले आहे. याठिकाणी जगदंबा व तुळजा भवानीचेही मंदिर आहे येथे अश्विन महिन्यात नवरात्र आणि चौत्र महिन्यातील पौर्णिमेला उत्सव साजरा केला जातो. नवरात्रातील नऊ दिवसांत भाविक डोंगरावर छोट्या-छोट्या राहुटया ठोकून येथेच राहतात.

या डोंगरावर अति प्राचीन तळे असूनत्यात अंघोळ केल्याने आत्मशुध्दी होऊन दुर्धर आजार नष्ट होतात अशी भाविकांची श्रध्दा आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची ख्याती असल्याने मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील भाविक सातवी माळीनिमित्त येथे गर्दी करतात.