
विजेच्या धक्क्यामुळे प्राणांतिक अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. ते टाळण्यासाठी विद्युत निरीक्षण विभागाने कंबर कसली आहे. त्यानुसार यापुढे सण-उत्सव काळात किंवा अन्य कारणासाठी तात्पुरता वीजपुरवठा हवा असेल तर आधी वीजपुरवठा खंडित यंत्रणा (अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर सिस्टीम) उभारणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे विजेचा दाब कमी-जास्त झाल्यास किंवा शॉर्टसर्किट झाल्यास तत्काळ वीजपुरवठा खंडित करण्याचे काम ही यंत्रणा करणार असल्याने संभाव्य धोका टळणार आहे.
गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव काळात तात्पुरती विद्युत मांडणी यंत्रणा उभारताना नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच आर्थिंग केली जात नाही. त्यामुळे विजेचा धक्का बसणे, आग लागणे आदी घटना घडतात. त्या पार्श्वभूमीवर विद्युत निरीक्षण कार्यालयाने तात्पुरते कनेक्शन देण्यासाठी निकष जाहीर केले आहेत. त्यामध्ये सर्किट ब्रेकर सिस्टीम उभारणे, विद्युत संच मांडणी लाकडी खांबावर करावी, केबल किंवा वायर्सचा जोड कोणत्याही धातूला चिटकू नये याची खबरदारी घेणे, भूमिगत केबलची योग्य पद्धतीने जोडणी करणे आदी बाबी नमूद केल्या असून त्याच्या पूर्ततेशिवाय तात्पुरते कनेक्शन देऊ नये, असे सर्वच मुंबईतील वीज वितरण कंपन्यांना बजावले आहे.


























































