
दोन वर्षांपूर्वी 29 सप्टेंबर 2017 रोजी एल्फिन्स्टन रोड चेंगराचेंगरीत 23 जणांचा प्राण गेल्यानंतर जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने दोन वर्षांत नवीन पादचारी पूल बांधण्याबरोबरच लिफ्ट आणि सरकते जिने बसविले आहेत. त्यामुळे प्रवासी सुविधा वाढल्याने लोकलचा प्रवास थोडा सुखकर बनण्यास मदत मिळाली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने दोन वर्षांत 94 पादचारी पूल उभारले आहेत.
एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेनंतर प्रवाशांच्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी परळ लोकलची सुरुवात करण्यात आली. परळ येथे 12 मीटर रूंदीचा भव्य पादचारी पूल उभारण्यात आला. लिफ्ट आणि सरकते जिने उभारण्यात आले त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना चांगली सोय झाली. सर्व पादचारी पुलांचे सुरक्षा ऑडिट करण्यात आले. कमजोर आणि धोकादायक पादचारी पुलांना तोडण्यात येऊन त्या जागी नवे पादचारी पूल बांधण्यात आले.
पश्चिम रेल्वेने बांधले 45 पूल
पश्चिम रेल्वेच्या हद्दीत मुंबई डिव्हीजनमध्ये 16 जानेवारी 2018 ते 14 सप्टेंबर दरम्यान 45 पादचारी पूल बांधण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सोयी व सुविधांसाठी 50 सरकते जिने पश्चिम रेल्वेवर बसविण्यात आले आहेत. तसेच आगामी काळात आणखी 75 सरकते जिने बसविण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेने 46 सरकते जिने बसविले
मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनमधील विविध रेल्वे स्थानकांवर 194 पादचारी पूल आहेत. त्यापैकी 49 पादचारी पूल गेल्या दोन वर्षांत बांधण्यात आले आहेत. अजून 19 पादचारी पूल तयार करण्याचे काम सुरू आहे. ते 2020 पर्यंत तयार होणार आहेत. त्याचबरोबर मध्य रेल्वेवर 46 सरकते जिने उभारले आहेत. विविध स्थानकांवर 29 लिफ्ट लावण्यात आल्या आहेत.




























































