जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा; ख्रिश्चियन कोलमन ठरला वेगवान धावपटू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेच्या ख्रिश्चियन कोलमनने दोहामध्ये सुरू असलेल्या जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत 100 मीटर शर्यतीत बाजी मारून वेगवान धावपटू होण्याचा मान मिळविला. 23 वर्षीय या धावपटूने 9.76 सेकंदांत शर्यत जिंकली. मात्र, आताच त्याला भविष्यातील उसेन बोल्ट म्हणणे योग्य ठरणार नाही. कारण बोल्टच्या (9.58से.) विश्वविक्रमी कामगिरीपासून अजून तो बराच दूर आहे.
कोलमनने आपलाच देशबांधव असलेल्या जस्टिन गॅटलीनला पिछाडीवर टाकले. 37 वर्षीय गॅटलीनला 9.89 सेकंद वेळेसह कास्य पदकावर समाधान मानावे लागले, तर रियो ऑलिम्पिकमध्ये तीन पदकांचा मानकरी ठरलेल्या कॅनडाच्या आंद्रे डी ग्रासने 9.90 सेकंद वेळेसह कास्यपदकाला गवसणी घातली. ख्रिश्चियन कोलमनवर काही आठवडय़ांपूर्वी ऍण्टी डोपिंग एजन्सीने बंदी घातली होती. तीन वेळा डोपिंग टेस्ट टाळल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. कोलमनवर एक किंवा दोन वर्षांची बंदी घातली जाणार होती. मात्र, नंतर बंदी उठविल्यामुळे तो यंदाच्या जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेत सहभागी होऊ शकला. 23 वर्षीय कोलमनने 100 मीटर शर्यतीत सुरुवातीपासून घेतलेली आघाडी टिकवत जेतेपदावर नाव कोरले. गॅटलीनने 2017च्या जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. मात्र, त्या सोनेरी यशाची पुनरावृत्ती करण्यात तो यंदा अपयशी ठरला.

हिंदुस्थानला रिलेमध्ये ऑलिम्पिकचे तिकीट

जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील 4 बाय 400 मीटर मिश्र रिले प्रकारात मोहम्मद अनस, क्ही.के. किस्मया, निर्मल नोह टॉम आणि जिस्ना मॅथ्यू या चमूने हिंदुस्थानला टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवून दिले. हिंदुस्थानी चौकडीने आपल्या हिटमध्ये 3ः16ः14 अशी वेळ नोंदवत तिसरे स्थान पटकावत अंतिम फेरीत प्रवेश केला. यंदाच्या हंगामात हिंदुस्थानी खेळाडूंनी नोंदवलेली ही सर्वोत्तम वेळ आहे. मोहम्मदने शर्यतीची सुरुवात करत चांगला खेळ केला. मात्र दुसऱ्या टप्प्यात विस्मया मागे पडली. मात्र वेळेतच स्वतःला सावरत विस्मयाने सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत पुन्हा एकदा आघाडी घेतली. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात हिंदुस्थानी धावपटूंमध्ये थोडा गोंधळ पाहायला मिळाला. मात्र निर्मल टॉमने तिसरं स्थान पटकावून हिंदुस्थानचं ऑलिम्पिक तिकीट निश्चित केलं.