गोराईतील बोगस डॉक्टर गजाआड, ‘युनिट 12’ची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वैद्यकीय पदवी नसतानाही सोयरासिस, पॅरालिसिसच्या रुग्णाशी खेळणाऱया डॉक्टर पितापुत्रांना ‘युनिट 12’ने अटक केली. रमेश होतीभाई अम्रोथ आणि होतीभाई धर्मसिंग अम्रोथ अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनाही एमएचबी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

मुंबईत मोठय़ा प्रमाणात बोगस डॉक्टर कार्यरत असून ते रुग्णाच्या जीवाशी खेळत आहेत. अशा डॉक्टरांविरोधात गुन्हे शाखेने कारवाईची मोहीम हाती घेतली होती. गोराईच्या खाडीजवळ एका दवाखान्यात गंभीर आजारावर उपचार केले जातात. उपचारासाठी रुग्ण लांबून येतात अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनखाली युनिट 12 चे पोलीस निरीक्षक सागर शिवलकर, सहायक निरीक्षक विक्रमसिंह कदम, अतुल आव्हाड यांच्या पथकाने गोराई येथील खासगी क्लिनिकमध्ये छापा टाकला तेव्हा रमेश आणि होतीभाई हे दोन रुग्णांना इंजेक्शन देताना दिसले. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

या दोघांकडेही वैद्यक क्षेत्राशी संबंधित पदवी आणि परवाना नव्हता. ते दोघे सोयरासिस, पॅरालिसिसच्या रुग्णाकडून उपचाराच्या नावाखाली पैसे उकळत होते. पोलिसांनी त्या क्लिनिकमधून वैद्यकीय साहित्य जप्त केले. या दोघांविरोधात फसवणूक आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या कलमांतर्गत गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद करून या दोघांना एमएचबी पोलिसांच्या ताब्यात दिले.