
जम्मू-कश्मीरमधून 370 कलम आणि 35(ए) हद्दपार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 35 हजार शहीद जवानांना खरी श्रद्धांजली वाहिली, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी केले.
शीघ्र कृती बलाच्या (आरएएफ) 27 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शहा बोलत होते. ते म्हणाले, कित्येक वर्षे जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना आमच्या जवानांना प्राण गमवावे लागत होते. 70 वर्षांपासून असलेली ही परिस्थिती बदलण्याची हिंमत कोणाकडे नव्हती. कोणी या प्रश्नाकडे पाहिलेसुद्धा नाही, अशा शब्दांत शहा यांनी याआधीच्या काँग्रेस सरकारच्या निक्रियतेवर टीका केली.
शांतता भंग करणाऱयांचा जवान ‘बंदोबस्त’ करतील!
जम्मू-कश्मीरचा आता झपाटय़ाने विकास होईल. येथील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱयांचा आमचे जवान योग्य बंदोबस्त करतील. त्यामुळे कश्मीर खोऱयात कायमस्वरूपी शांतता नांदेल, असा विश्वास शहा यांनी कश्मीर व उर्वरित हिंदुस्थानातील नागरिकांना उद्देशून व्यक्त केला.























































