
उत्तर गोव्यात मोरजी येथे ‘न्यूड पार्टी’ आयोजित करण्यात आली आहे अशी जाहिरात व्हायरल करून गोव्याची बदनामी केल्या प्रकरणातील मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळण्यात गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलासांना यश आले आहे. कातीहार- बिहारमध्ये अटक केलेल्या संशयिताला सोमवारी गोव्यात आणण्यात आले आहे. मंगळवारी त्याला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे. संशयिताचे नाव अरमान मेहता (30) असून त्याच्या विरोधात आयटी कायदा 67 कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संशयित मुळ बिहार येथील असून दिल्लीत येऊन तो ‘न्यूड पार्टी’संदर्भात सोशल मिडीयावर जाहिरात करत असल्याचे उघड झाले आहे. खरोखरच ‘न्यूड पार्टी’चे आयोजन करण्यात येणार होते की अन्य कोणत्या कारणासाठी अशा प्रकारची संशयित जाहिरात करत होता याचा शोध पोलीस घेत आहेत. सोशल मीडियावर मोरजी येथील गोवा प्रायव्हेट पार्टीसंदर्भात (‘न्यूड पार्टी’) 22 सप्टेंबर रोजी जाहिरात करण्यात आली होती. पार्टीला येण्यास इच्छूक असलेल्यांना संपर्क करण्यासाठी एक मोबाईल नंबर देण्यात आला होता. ही जाहिरात व्हॉट्सअपवर वेगाने व्हायरल होताच गोव्यात खळबळ माजली होती.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ‘न्यूड पार्टी’च्या जाहिरातीमुळे गोव्याच्या होत असलेल्या बदनामीची दखल घेऊन पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते. सीआयडीचे अधीक्षक पंकज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक महेश गावकर, निरीक्षक सिध्दांत शिरोडकर, राजेश कुमार, चेतन पाटील, हवालदार विजय साळगावकर, कॉन्स्टेबल विनय श्रीवास्तव, अशोक पालकर यांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरुन संशयिताचा ठावठिकाण शोधून काढला आणि ठिकठिकाणी पोलीस पथक पाठवले. संशयित दिल्ली, बिहार डेराडून पच्छिम बंगाल येथे फिरत असल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता.
सोशल मीडियावर जाहिरात करण्यात आलेल्या छायाचित्रात एकमेकावर नग्नावस्थेत पहुडलेल्या विदेशी महिला दिसत आहेत, तसेच या जाहिरातीवर गोवा प्रायव्हेट पार्टीच्या शिर्षकात ‘न्यूड पूल पार्टी’ असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामध्ये मोरजी आश्वे रोड गावडेवाडा रोड, मोरजी गोवा असा पत्ता नमूद करण्यात आला होता.






























































