
रयत शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा ‘पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार’ इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांना तर ‘रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार’ थरमॅक्स कंपनीच्या माजी अध्यक्षा अनु आगा यांना जाहीर झाला आहे. हे पुरस्कार माजी केंद्रीय कृषिमंत्री व रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 4) सकाळी कर्मवीर समाधी परिसरात होणाऱया कार्यक्रमात प्रदान केले जाणार आहेत. याबाबत माहिती देताना संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे म्हणाले, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक अशा क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून राष्ट्रीय विकासात महत्त्वाचे योगदान देणाऱया व्यक्तींना संस्थेच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. रयत शिक्षण संस्थेचा शंभरावा वर्धापन दिन कार्यक्रम शुक्रवार दि. 4 रोजी साजरा होणार आहे. त्यावेळी या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.





























































