सांताक्रुजमध्ये देवीच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक

सांताक्रुज येथे देवीचे दागिने चोरणाऱयाला वाकोला पोलिसांनी अटक केली. विजय शंकर बहोत असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

सांताक्रुजच्या शिवाजीनगर येथे नवरात्रोत्सव मंडळ आहे. मंगळवारी पहाटे विजय हा दर्शन घेण्याचा बहाणा करून मंडपात आला. मंडपात कोणी नसल्याचे पाहून त्याने देवीच्या गळ्यातील हार चोरला. हा प्रकार मंडपात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. देवीच्या गळ्यातील हार चोरीला गेल्याची बातमी वाऱयासारखी पसरली. या घटनेची माहिती कळताच वाकोला पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक कैलास आव्हाड यांच्या पथकातील सहाय्य्क निरीक्षक सागर निकम यांच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी तपास करून अवघ्या काही तासांतच विजयला गजाआड केले. त्याच्याकडून चोरीला गेलेला हार पोलिसांनी जप्त केला. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.

फाटक्या सीट कव्हरवरून पकडले
विजय हा पूर्वी गावदेवी परिसरात राहत होता. चोरीच्या आदल्या दिवशी तो मंडपात येऊन रेकी करून गेला होता. तपासा दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. चोरटा नेमका कोण आहे हे स्पष्ट होत नव्हते. तेव्हा पोलिसांना एका फुटेजमध्ये मोटार सायकलचे फाटके सीट कव्हर दिसले. त्यानंतर पोलिसांनी गावदेवी परिसरातील फाटक्या सीट कव्हर असलेल्या मोटारसायकली शोधून विजयला गजाआड केले.