
शिरुर तालुक्यातील निमगाव (मायंबा) येथील मत्स्येंद्रनाथ संस्थानचे मठाधिपती महंत स्वामी निगमानंद महाराज यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने देहावसान झाले. नगर येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 97 वर्षांचे होते. राज्यभरात त्यांचा हजारोंचा शिष्य परिवार या घटनेमुळे शोकात बुडाला.
शिरुर तालुक्यातील नांदेवाली हे जन्मगाव असलेल्या महंत निगमानंद महाराज यांनी निमगाव येथे मत्स्येंद्रनाथ संस्थानाची स्थापना केली होती. परिसरातील लोक अंश्रधद्धेच्या व अज्ञानाच्या विळख्यात असताना त्यांनी मत्स्येंद्रगडाच्या माध्यमातून या परिसरात अध्यात्माची बिजे रोवून नागरिकांना अध्यात्म मार्ग दाखवला. परिसरातील गरिबी, अज्ञान दूर करण्यासाठी निमगाव व गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथे निगमानंद विद्यालयाची स्थापना केली. विद्यार्थ्यांना शहरी भागाप्रमाणे उच्च दर्जाच्या शिक्षण सुविधा उपलब्ध करुन देत विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणले. किर्तन, प्रवाचनाच्या माध्यमातून समाज जागृती केली. कधीकाळी पशूहत्या होणाऱ्या मायंबाचा कायापालट करुन मत्स्येंद्रगड उभारला. नारळी सप्ताह, आषाढी वारी सुरु केली. आळंदी, पंढरपूर, पैठणमध्ये मठांची स्थापना केली. गडाचा कायपालट करुन भव्य दिव्य बांधकाम केले. वयाच्या 97 व्या वर्षांपर्यंत त्यांचे हे काम अविरत सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. नगर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या देहावसनाची बातमी कळताच जिल्ह्यासह राज्य भरातील त्यांच्या शिष्यपरिवाराने मत्स्येंद्रगडाकडे धाव घेतली होती. शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता त्यांना समाधी देण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे
























































