
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे किरकोळ वादातून एकाचा खून झाल्याची घटना सोमवारी रात्री बालाजी देडगाव येथे तेलकुडगाव रस्त्यावर घडली. शेषराव पांडुरंग मोरे (वय 50, रा. देडगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
बालाजी देडगाव येथील शेषराव पाडुरंग मोरे व संभाजी उर्फ बाळू शिवाजी थोरात यांनी सोमवारी मद्यपान केले होते. त्यानंतर त्यांच्यात किरकोळ कारणातून बाचाबाची सुरू झाली. याच रागातून थोरात याने मोरे यांच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने वार केले. त्यात मोरे याचा मृत्यू झाला. ही घटना देडगाव-तेलकुडगाव रस्त्यावर घडली. मोरे याचा मृतदेह मोसंबी बागेत आढळला आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर नेवासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा रितसर पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. पोलिसांनी संभाजी थोरात याला ताब्यात घेतले आहे.

























































