
>> वरद चव्हाण
विशाल निकम. व्यायाम प्रशिक्षक ते अभिनेता हा प्रवास व्यायामाच्या साथीनेच झालेला.
नमस्कार फिटनेस फ्रिक्स! आजपर्यंत अनेक कलाकारांचे लेख लिहीत आलो. काही कलाकारांना आधीपासूनच व्यायामाची आवड होती, तर काहींनी स्वतःला प्रसिद्धी मिळाल्यावर आपण आता प्रेझेंटेबल राहायला हवं म्हणून व्यायामाचा मार्ग स्वीकारला, पण आजच्या आपल्या सेलिब्रिटीचं करिअरच एक फिटनेस ट्रेनरचं होतं. जशी व्यायामाची आवड, तशीच अभिनयाचीसुद्धा! पण स्ट्रगलच्या काळात घरी दोन पैसे यावेत व स्वतःला मेंटेन करण्यासाठी लागणारा खर्च आई-बाबांकडून न मागता आपण स्वतः त्या पैशांची सोय करावी म्हणून एक जिम इन्स्ट्रक्टर म्हणून कामाला लागला. थोडक्यात काय तर ही म्हणच आहे ना की, ‘एक तीर में दो निशान’, तसंच आपल्या आजच्या कलाकाराचे आहे. म्हणजे बघा जिम इस्ट्रक्टर म्हणून कामाला लागल्याने व्यायामाची आवड जपता आली. त्यातून मिळणाऱया पगारातून घरी दोन पैसेही आले. याशिवाय अभिनयाची आवड असल्यामुळे रिकाम्या वेळेत ऑडिशन देणंसुद्धा जमत होतं. या सगळय़ा मेहनतीचं फळ म्हणजे आज ‘स्टार प्रवाह’वर गाजत असलेल्या ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेतून तो मुख्य भूमिकेतून आपल्यासमोर आलाय. आजचा आपला सेलिब्रिटी आहे ‘विशाल निकम’. शाळेत असल्यापासूनच विशाल स्पोर्टस्मध्ये खूप ऑक्टिव्ह होता. कबड्डी, खो-खो टीमचा कॅप्टन असायचा. मग कॉलेजमध्ये असतानासुद्धा स्वतःच्या कॉलेजला उत्तम क्रिकेट खेळून रिप्रेझेंट केलं. याशिवाय दोन वर्ष एन.सी.सी.च्या माध्यमातून महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं. म्हणजे वाढत्या वयातच मैदानी खेळ खेळून उत्तम शरीर कमवण्याचा पाया विशालने रचला होता. मग एम.एस.सी. इन फिजिक्स करायला विशाल पुण्याला शिफ्ट झाला. या काळात त्याला व्यायामाबद्दल आकर्षण वाटू लागलं.
कॉलेजला असताना विशाल व्यायामाबद्दल अत्यंत सीरियस होता. सिक्स पॅक्स व अत्यंत मसक्यूलर शरीराची त्याला क्रेज होती. कॉलेजनंतर रोज तो कमीत कमी 2-3 तास व्यायाम करत असे. यात हेवी वेट्स व कर्डिओ दोन्हीचा समावेश होता. मग हळूहळू पुण्यात मास्टर फिजिक्स करायला आलेला विशाल मास्टर्स इन बॉडी बिल्डिंग झाला असं म्हणायला हरकत नाही आणि पुण्यातच एक जिम इन्स्ट्रक्टर म्हणून पार्ट टाईम जॉब करू लागला. व्यायामाला अभिनयाची जोड तेव्हा लागली जेव्हा कॉलेज गॅदरिंगमध्ये विशालने ‘खंडोबा’ची भूमिका केली. स्वतःला मिळालेला प्रतिसाद पाहून आपल्यात अभिनयाचेही गुण आहेत असं विशालला वाटू लागलं आणि म्हणून त्याने दर शनिवार व रविवारी लक्ष्य थिएटरमधून अभिनयाचे धडे शिकायला सुरुवात केली. आता अभिनयात करीअर करायचं म्हणजे मुंबईत येण्याशिवाय पर्याय नाही हे विशालला माहीत होतं, पण मुंबईत येऊन नुसतं स्ट्रगल करणं विशालला झेपणारं नव्हतं. विशाल ऐकून होता की, गोल्डस् जिममध्ये अनेक कलाकार वर्कआऊटसाठी येतात. स्वतः कमावलेलं शरीर व व्यायामाचे ज्ञान ही आपली ताकदीची बाजू आहे याची जाणीव विशालला होतीच आणि म्हणून त्याने कांदिवलीच्या गोल्डस् जिममध्ये पर्सनल ट्रेनर म्हणून नोकरी मिळवली. नोकरी सांभाळत तो विविध ऑडिशन्स देत असे. असाच स्ट्रगल करत करत त्याने दोन मराठी चित्रपट व आता चालू असलेली मालिका ‘साता जल्माच्या गाठी’ स्वतःच्या पदरात पाडून घेतली.
या स्ट्रगलमध्ये विशालला अभिनेत्री ‘स्मिता शेवाळे’ हिची खूप मदत झाली. ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेत शूटिंग साताऱयाला जोरात सुरू आहे. अतिव्यस्त शूटिंगमधून व्यायामासाठी वेळ काढायची विशालची पद्धत जरा वेगळीच आहे. व्यायामाचं उत्तम ज्ञान असल्यामुळे तो शूटिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या लाईट, सॅण्ड बॅग किंवा क्रेनसाठी वापरली जाणारी वजनं घेऊन व्यायाम करतो. याशिवाय पॉवर योगाचासुद्धा आधार घेतो. याच मालिकेच्या चाहत्याने, जो स्वतः एका व्यायाम शाळेचा मालक आहे, विशालला त्याच्या व्यायामशाळेत व्यायाम करायचे आमंत्रण दिले. एवढेच नव्हे तर त्या माणसाच्या जेव्हा असं लक्षात आलं की, शूटिंग किती वेळ चालेल याची काही खात्री देता येत नाही तेव्हा त्या माणसाने स्वखुशीने विशालच्या हातात व्यायामशाळेची किल्ली दिली. चाहत्यांकडून मिळणाऱ्या या प्रेमामुळेच विशाल रात्री उशिरा किंवा पहाटे त्याला जमेल तसं न चुकता व्यायाम करतो. डाएटिशियन (आहारतज्ञ) सिद्धेश ओझाच्या मार्गदर्शनाने विशालने स्वतःचा आहार ठरवलाय. प्रत्येक आहाराचं वजन करून विशाल खातो, उदा. 200 ग्रॅम बटाटे, 200 ग्रॅम चिकन, ओटस्सारख्या गोष्टी अगदी मोजूनमापून खातो. याच्या जोडीला डाळ, सोयाबीन व पनीरसुद्धा असतं. रात्री विशाल पोळी अजिबात खात नाही. फक्त चिकन व भात. एक ट्रेनर असल्यामुळे विशालला त्याच्या चाहत्यांना आवर्जून सांगावंसं वाटतं की, व्यायामाचा उत्साह आणि अतिउत्साह यात एक खूप थिन लाइन असते. चांगले शरीर कमवण्यासाठी कुठलेही शॉर्टकट्स नाहीत. अतिउत्साहाच्या नादात तुम्हाला आयुष्यभराची जखम होऊ शकते. याशिवाय कमी वेळात चांगली बॉडी कमवण्यासाठी स्टेरॉइंड्सच्या नादाला अजिबात लागू नका. प्रोटिन सप्लिमेंट्ससुद्धा तुमच्या ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली घ्या!

























































