देशातल्या पहिल्या पदवीधर महिलेला गुगल डुडलची मानवंदना!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरातल्या अनेक मान्यवरांना आपल्या अनोख्या शैलीत सन्मान देणाऱ्या गुगलवर शनिवारी एक खास महिला झळकली आहे. हिंदुस्थानमधल्या सामाजिक क्रांती घडवणाऱ्या अनेक स्त्रियांपैकी त्या एक आहेत. त्यांचं नाव कामिनी रॉय. गुगलने रॉय यांच्या कर्तृत्वाला एका खास डुडलने मानवंदना दिली आहे.

कामिनी रॉय या समाजसुधार तसेच सामाजिक कार्यकर्त्या होत्या. स्त्रीवादी म्हणून त्यांचा लढा इतिहासात नोंदवला गेला आहे. त्याखेरीज त्या उत्तम कवयित्री होत्या. पण, त्यांची खरी ओळख आहे ती ब्रिटीश शासनकालातील हिंदुस्थानच्या पहिल्या पदवीधर महिला अशी आहे. कामिनी रॉय यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1864मध्ये पश्चिम बंगालच्या बसंता गावात झाला. त्याकाळात पारतंत्र्यात जखडलेल्या देशातील स्थितीची झळ त्यांनाही बसली. पण त्या डगमगल्या नाहीत. स्वातंत्र्यपूर्व काळात बंगाल प्रांतात सामाजिक सुधारणांना सुरुवात झाली होती. लहानपणापासूनच स्वतंत्र विचारांच्या कामिनी रॉय यांनी आपलं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी 1886साली कलकत्ता विद्यापीठाच्या बेथ्युन महाविद्यालयातून संस्कृत या विषयात तत्कालीन दिल्या जाणाऱ्या बी. ए. (ऑनर्स) या पदवी अभ्यासक्रमाचं शिक्षण पूर्ण केलं आणि देशातल्या पहिल्या महिला पदवीधर ठरल्या.

1889मध्ये त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतरही त्यांची काही पुस्तके प्रकाशित झाली. महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी त्या आयुष्यभर झटत राहिल्या. बंगाली विधवांची भीषण स्थिती बदलण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. तत्कालीन सामाजिक स्थितीचा विचार करता स्त्रियांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या बंगालच्या काही आदरणीय व्यक्तींपैकी कामिनी रॉय या एक आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने विशेष डुडल साकारत त्यांना मानवंदना दिली आहे.