आळंदीचे श्रीनरसिंह सरस्वती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

देवाच्या आळंदीचे वैभव जपणारे थोर सत्पुरुष श्रीनरसिंह सरस्वती स्वामीमहाराज यांच्या कार्याविषयीचा हा लेख.

अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र’ असून तिथे नांदणाऱया ज्ञानियांच्या राजामुळे ती तिन्ही लोकांमध्ये ख्यातकीर्त आहे. वारकरी संप्रदायामध्ये भागवतधर्माची पताका खांद्यावर घेऊन डौलाने वाटचाल करणाऱया प्रत्येकासाठी श्रीज्ञानेश्वरमाऊली हे आराध्य दैवत आहे. श्रीविठ्ठल हीच निजखूण मानणाऱया ‘वारकरी’ संप्रदायाचा गजर ज्या ‘ज्ञानोबामाऊली तुकाराम’ संबोधनाने होतो, त्यातील ज्ञानोबा अर्थात श्रीज्ञानदेवांची अलंकापुरी ‘आळंदी’ तिचे पुराणकालीन वैभव आणि पुढे साक्षात ज्ञानदेवांनी तिथे संजीवन समाधी घेतल्यामुळे त्रिभुवनास वंदनीय आहे.

श्रीक्षेत्र आळंदीचे माहात्म्य व महती सर्वत्र, सर्वदूर पोहोचण्यामागे अनेक दिग्गज संतसत्पुरुष, सिद्धमाहात्मे आणि सेवाभावाने कार्यरत असणारी भक्तमंडळी वेळोवेळी कारण ठरली आणि त्यांच्यातीलच एक महत्त्वाचे नाव होते ते ‘श्रीनरसिंह सरस्वती महाराज’ यांचे. आजही ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीपासून अगदी थोडक्याच अंतरावर ‘गोपाळपुरा’ येथे जाणाऱया रस्त्याच्या डाव्या बाजूस श्रीनरसिंह सरस्वतींचा समाधी मठ आहे. फारशी वर्दळ नसलेल्या आणि माऊलींच्या समाधीस्थानामुळे उसळणाऱया गजबजाटापासून दूर असलेला हा परिसर निवडून श्रीनरसिंह सरस्वती महाराजांनी येथे त्यांच्या अवतारकार्याची इतिश्री केली. पुरातन वाडय़ाचे मजबूत दगडी बांधकाम, प्रवेशद्वारातून आत जाताच चारही बाजूस दिसणाऱया सुरेख ओवऱया, समोर भव्य सभामंडप आणि त्याच्या शेवटाकडे असलेली श्रीनरसिंह सरस्वती महाराजांची समाधी पाहून मन तृप्त होते.

श्रीनरसिंह सरस्वती स्वामी ‘आसेतु हिमाचल’ संचार करून सन 1874 मध्ये आळंदी येथे आले. सतत भजन करण्यात मग्न असलेल्या अन् भावसमाधीत रंगलेल्या श्रीनरसिंहस्वामींनी आळंदीकरांना तसेच पंचक्रोशीतील समस्त भाविकांना भजनाचे वेड लावले. ते ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि नाथांच्या भागवतावर रसाळ प्रवचने करीत असत. या प्रवचनांच्या माध्यमातून श्रीनरसिंहस्वामींनी ज्ञानेश्वरमाऊलींच्या शिकवणीचा प्रचार आणि प्रसार केला. श्रीनरसिंहस्वामी आळंदी येथे दाखल झाले तेव्हा माऊलींच्या वास्तव्याने पावन झालेल्या वास्तू, आणि परिसर कळाहीन अवस्थेत होता, हे पाहून श्रीनरसिंहस्वामींनी पुढाकार घेतला व सिद्ध बेट, इंद्रायणी नदीकाठचा परिसर, घाट आणि माऊलींच्या समाधी मंदिर परिसराची डागडुजी करवून उत्तम रितीने बांधून घेतला. पुण्याचे श्रीस्वामीसमर्थभक्त नंदरामजी नाईक यांच्याकडून माऊलींच्या समाधी मंदिराच्या कळसाचे काम करवून घेतले आणि समाधीच्या मागील बाजूस श्रीमुक्ताबाईंचे मंदिर उभारले. आज आळंदी येथे ज्ञानेश्वरांशी निगडित सर्व पावन वास्तू उत्तम रितीने असल्याचे आढळते त्यामागे श्रीनरसिंहस्वामींचे श्रमसायास आहेत.

दरम्यान आळंदीमधील अनेकांना श्रीनरसिंहस्वामींमधील देवत्वाचा परिचय घडत होता. त्यांच्या हातून घडणाऱया अलौकिक लीला प्रसंगांतून अडलेल्या नाडलेल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्या. आळंदी येथेच समाधिस्थ होईपर्यंतच्या या 11 वर्षांच्या कालावधीत आळंदी तीर्थक्षेत्राचा चेहरामोहरा बदलणारे श्रीनरसिंहस्वामी होते तरी कोण? कुणाच्या मते ते श्रीस्वामीसमर्थ संप्रदायातील सत्पुरुष होते, तर कुणाच्या मते ऐतिहासिक काळात श्रीमुकुंदराजांपासून जी संतपरंपरा निर्माण झाली त्यांच्यापैकी एक महत्त्वाचे संत होते. ब्रह्मर्षि अण्णासाहेब पटवर्धन आणि धुळ्याचे पद्मनाभस्वामी यांच्या वक्तव्यानुसार सांगायचे तर अनेक तत्कालीन विद्वान व समाजसुधारक कर्मठ मंडळींनीदेखील श्रीनरसिंहस्वामींचे उघडपणे कौतुक करावे इतके ते द्रष्टे आणि उदारमतवादी सत्पुरुष होते.

श्रीनरसिंहस्वामी सहा फूट उंच, धिप्पाड व मजबूत बांध्याचे होते. आजानुबाहू, वर्ण निमगोरा, नम्र वृत्ती, स्वभावाने वरकरणी मिश्किल मात्र अंतर्यामी गंभीर, भालप्रदेशावर वैष्णव संप्रदायाची काळी रेघ ओढणारे आणि वारकरी संप्रदायाची तुळशीमाळ परिधान करणारे श्रीनरसिंहस्वामी पूर्णतः निःसंग आणि निःस्पृह होते. आळंदीत कायमस्वरूपी वास्तव्य करण्याआधी श्रीनरसिंहस्वामी सर्वत्र सहज संचार करीत असत. कधी जटाभार वाढलेला, कधी डोक्यावर भरजरी मंदील, कधी बोटात रत्नजडित अंगठय़ा, कधी अंगावर भरजरी वस्त्र्ा, कधी नेसूचे रेशमी वस्त्र्ा तर कधी कमरेस जेमतेम लंगोटी अशा पेहरावात ते पंचक्रोशीत पायी भ्रमण करीत असत.

अशाच एका सहज संचारात श्रीनरसिंहस्वामी अक्कलकोटास गेले तेव्हा श्रीस्वामीसमर्थ महाराजांनी त्यांचे स्वागत केले. इतकेच नाही तर त्यांना साधनमार्गाविषयी अवगत केले आणि मार्गदर्शनपर बोध केला. त्यानंतर, आळंदीस परतल्यानंतर श्रीनरसिंहस्वामींनी श्रीमाऊलींच्या संजीवन समाधीसमोर दररोज रात्री भजन करण्यास प्रारंभ केला. हातात तंबूरी घेऊन ते स्वतः भजनास उभे राहात असत. हळूहळू त्यांच्याभोवती भक्त जमू लागले. सन 1881 मध्ये श्रीनरसिंहस्वामींनी माऊलींसाठी रथ तयार केला आणि अतिशय भव्य रथोत्सवाला प्रारंभ झाला. आळंदी क्षेत्राला पूर्ववत वैभव प्राप्त करून देण्याचे काम श्रीनरसिंहस्वामींनी मोठय़ा तडफेने पूर्ण केले.

काळबुवा, काकामहाराज पुराणिक, देव मामलेदार असे अनेक दिग्गज सिद्धसत्पुरुष त्याकाळी श्रीनरसिंहस्वामींचे समकालीन आणि नित्य गाठीभेटीतील होते. तसेच त्यांच्या शिष्यवर्गामध्ये अण्णासाहेब पटवर्धन, श्रीनारायणबुवा रुद्र (धुळे), श्रीराधाकृष्णस्वामी (रहिमतपूरकर), श्रीपादस्वामी, लोणारचे श्रीसच्चिदानंद स्वामी, श्रीआपदेव महाराज असे अनेक दिग्गज सत्पुरुषही होते. श्रीनरसिंहस्वामींच्या संप्रदायामध्ये त्यांचा वारसा पद्मनाभस्वामी (धुळे) यांच्यापाशी आला. श्रीनरसिंहस्वामींनी त्यांच्या संप्रदायाचे वास्तविक स्वरूप व बैठक स्पष्ट करून देण्यासाठी ‘श्रीस्वात्मसौख्य’ हा ग्रंथ लिहिला. 516 ओव्यांच्या या छोटेखानी ग्रंथात कर्म-उपासना आणि ज्ञान अशी तीन कांडे आहेत. सोबतच त्यांनी अंतरानुभव, श्रीगुरुपासष्टी स्तोत्रे आदी रचनाही केल्या. कर्म, भक्ती व ज्ञानयोगांची सांगड घालून भक्तीप्रेमाची बैठक अंगीकारण्यासाठी भक्तांना प्रवृत्त केले. भक्तीप्रेमाचा झेंडा खांद्यावर घेत भागवतधर्माचा पुरस्कार करीत आपल्या संप्रदायाचाही विस्तार करणाऱया श्रीनरसिंहस्वामींनी 20 जानेवारी 1886 रोजी समाधी घेतली. श्रीस्वामींचे चरित्र बाळ पाळेकर यांनी लिहिलेले आहे.

– [email protected]