कुर्ल्यात विकासकामांवर महायुती स्वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 कष्टकरी कामगार वर्गाचे प्राबल्य असलेल्या कुर्ला विधानसभा क्षेत्रात शिवसेना-भाजप-रिपाइं महायुती विकासकामांवर स्वार असल्याचे चित्र आहे. गेल्या पाच वर्षांत शिवसेनेचे आमदार, नगरसेवकांनी विभागात मोठय़ा प्रमाणात विकासकामे केली आहेत. मोडकळीस आलेल्या म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास, शासकीय जमिनीवरील गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करून दिला आहे. तसेच स्वदेशी मिल कामगारांची थकीत असलेली देणी मिळवून देण्यासाठी शिवसेनेने केलेल्या यशस्वी मध्यस्थी आदी कामांमुळे महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या प्रचाराला नागरिकांचा चागला प्रतिसाद मिळत आहे.

अडीच लाख मतदार असलेला कुर्ला विधानसभा मतदारसंघ कुर्ला पश्चिम, कुर्ला पूर्व, चुनाभट्टी, टिळकनगर आणि चेंबूरच्या काही भागांत पसरला आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार आणि महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांनी गेल्या पाच वर्षांत मोठय़ा प्रमाणात विकासकामे केली आहेत. त्यामुळेच त्यांना मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.

म्हाडा वसाहतीमध्ये 60 वर्षांहून अधिक जुन्या मलनिस्सारण वाहिन्या आहेत. त्या वारंवार फुटत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर मंगेश कुडाळकर यांच्या प्रयत्नाने म्हाडाने मलनिस्सारण वाहिन्यांच्या नूतनीकरणसाठी तब्बल 145 कोटी रुपये मंजूर केले असून लवकरच काम सुरू होणार असल्यामुळे रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहेत.

गिरणी कामगारांना न्याय

स्वदेशी मिल 20 वर्षांपूर्वी बंद पडली असली तरी 2800 कामगारांना अद्याप त्यांच्या हक्काचे पैसे मिळालेले नाहीत. त्याची दखल घेत कुडाळकर यांनी नुकतीच सर्व श्रमिक संघटना (लाल बावटा), आरएमएस आणि गिरणी कामगार संघ यांना एकत्र करून नुकतीच मिल व्यवस्थापनाशी चर्चा केली असून लवकरच कामगारांना पैसे मिळतील असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर मतदारसंघात बालवाडी, व्यायामशाळा आणि शौचालयांची 250 हून अधिक कामे आमदार निधीतून केली आहेत.

वर्षानुवर्षे लटकलेल्या पुनर्विकासाला गती

कुर्ला विधानसभेत नेहरूनगर, टिळकनगर, नवीन टिळकनगर आणि सहकार नगर येथे जवळपास म्हाडाच्या 340 इमारती आहेत. या इमारती 60 वर्षांपेक्षा जुन्या असल्याने मोडकळीस आल्या आहेत. पण त्यांच्या पुनर्विकासाबाबत सरकारचे धोरणच नसल्याने गेल्या दहा वर्षांपासून त्यांचा पुनर्विकास लटकला होता. त्या पार्श्वभूमीवर आमदार कुडाळकर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून सरकारकडे पाठपुरावा केल्याने सरकारने पुनर्विकासाचे धोरण आणल्याने त्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच शासकीय जमिनीवरील गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासात येणार परवानगीचा अडसरही कुडाळकर यांच्या प्रयत्नांमुळे दूर झाला आहे. त्यामुळे शिवसृष्टी वसाहत कुर्ला (पूर्व), पेस्तम सागर वसाहत चेंबूर, अशोकनगर चुनाभट्टी, कामगार नगरमधील हजारो रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.