जनशताब्दीची दिवाळीत  पुन्हा निसर्ग सहल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणातील निसर्गाचा मनमुराद आनंद घेता यावा यासाठी मध्य रेल्वेने दोन वर्षांपूर्वी दादर-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसला जोडलेला पारदर्शक विस्टाडोम कोच देखभालीनंतर पुन्हा नव्याने सज्ज झाला आहे. दर अठरा महिन्यांनंतर डब्यांना कारशेडमध्ये देखभालीसाठी रवाना केले जाते. तसेच विस्टाडोम कोचलाही देखभाल-दुरुस्तीसाठी कारशेडमध्ये नेले होते. त्या वेळी डब्यांची अंतर्गत फिटिंग, विद्युत यंत्रणा, प्रसाधन गृह यांची तसेच व्हील ट्रोली अशांची दुरुस्ती करण्यात आली असून जनशताब्दीला हा पारदर्शक कोच पुन्हा जोडण्यात आला आहे. त्यामुळे दिवाळीत कोकणात जाणार्‍या चाकरमानी जनता तसेच पर्यटकांना कोकणातील नैसर्गिक सौंदर्य पारदर्शक विस्टाडोममधून पुन्हा अनुभवायला मिळणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. पारदर्शक डब्यातील दादर ते मडगाव प्रवासासाठी 2,235 तर रत्नागिरीपर्यंतच्या प्रवासासाठी 1,480 रुपये तिकीट दर आहे.