मुंबईत जन्मलेल्या अभिजित बॅनर्जींना अर्थशास्त्राचे नोबेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी वंशाचे अमेरिकन अर्थतज्ञ डॉ. अभिजित बॅनर्जी यांच्यासह त्यांच्या पत्नी एस्थर डफलो आणि मायकल क्रेमर यांना यावर्षीचा अर्थशास्त्रातील ‘नोबेल पुरस्कार’ जाहीर झाला आहे. ‘वैश्विक गरिबी नष्ट करण्यासाठीचा लढा आणि त्यावरील उपाययोजना’ या विषयावर तिघा अर्थतज्ञांनी मूलभूत संशोधन केले आहे. अमर्त्य सेन यांच्यानंतर अर्थशास्त्रात ‘नोबेल’ मिळविणारे बॅनर्जी हे दुसरे हिंदुस्थानी वंशाचे नागरिक ठरले आहेत. बॅनर्जी यांचे महाराष्ट्राशी नाते आहे. त्यांच्या आई मुंबईतील आहेत.

मुंबईत जन्मलेले 58 वर्षीय अभिजित बॅनर्जी यांनी कोलकाता विद्यापीठात अर्थशास्त्रात पदवी घेतली. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) त्यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर बॅनर्जी अमेरिकेत गेले आणि हॉवर्ड विद्यापीठातून डॉक्टरेट मिळविली. अमेरिकेतील प्रसिद्ध मॅसेच्युसेट इन्स्टिटय़ूट आणि टेक्नॉलॉजीमध्ये (एमआयटी) ते अर्थशास्त्राचे प्रोफेसर आहेत. त्यांची पत्नी एस्थर डफलो याही तेथेच अर्थशास्त्राच्या प्रोफेसर आहेत. बॅनर्जी आणि डफलो हे ‘अब्दुल लतीफ जमील पॉवर्टी ऍक्शन लॅब’चे को-फाऊंडर आहेत. बॅनर्जी, डफलो आणि क्रेमर यांनी वैश्विक गरिबी समूळ नष्ट करण्यासाठी संशोधन करून उपाययोजना सुचविल्या आहेत.

नोटाबंदीला होता विरोध
2016च्या नोटाबंदीच्या निर्णयाला अभिजीत बॅनर्जी यांनी कडाडून विरोध केला होता. नोटाबंदीमुळे सुरुवातीला ज्या नुकसानीचा अंदाज सांगण्यात येत होता त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक नुकसान होईल. सर्वाधिक फटका असंघटीत क्षेत्राला बसेल, असे भाकित त्यांनी वर्तविले होते.

कॉग्रेसच्या ‘न्याय’ योजनेत योगदान
2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ‘न्याय’ योजनेची घोषणा केली होती. या योजनेची रुपरेषा आखण्यामध्ये बॅनर्जी यांचे मोठे योगदान होते.

महाराष्ट्राशी नाते
अभिजीत बॅनर्जी यांच्या आई निर्मला यांचे माहेर मुंबईत आहे. माहेरचे नाव हे निर्मला पाटणकर. आई निर्मला आणि वडील दीपक बॅनर्जी हे दोघेही कोलकाता येथे अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. ते कोलकाता येथेच राहतात. अभिजीत यांना अर्थशास्त्राचे धडे घरातूनच मिळाले. मुलगा अभिजीत आणि सून एस्थर या दोघांना एकाचवेळी नोबेल मिळाले याचा खूप आनंद आहे. मी इंग्रजीत विपूल लिखाण केले आता मला मराठीत लिखाण करायचे आहे, असे निर्मला यांनी सांगितले.

गरिबीविरुद्धचा लढा
वैश्विक गरिबी नष्ट करण्यासाठी या तिघा अर्थशास्त्रज्ञांनी मूलभूत संशोधन केले. त्यांच्या संशोधनामुळे जागतिक स्तरावर गरिबीविरुद्धच्या लढय़ाला मोलाची मदत झाली आहे, असे नोबेल पुरस्कार निवड समितीने म्हटले आहे.

‘नोबेल’ मिळणारे नववे हिंदुस्थानी

  • रवींद्रनाथ टागोर (1913)- साहित्य
  • सी.व्ही. रामन (1930)- भौतिकशास्त्र
  • हरगोबिंद खुराणा (1968) – मेडिसीन
  • मदर तेरेसा (1979) – शांतता
  • सुब्रमण्यम चंद्रशेखर (1983) – भौतिकशास्त्र
  • अमर्त्य सेन (1998) – अर्थशास्त्र
  • वेंकटरामन रामकृष्णन (2009) – रसायनशास्त्र
  • कैलास सत्यार्थी (2014) – शांतता
  • अभिजित बॅनर्जी (2019) – अर्थशास्त्र