
माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. पटेल यांना कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्चीच्या पत्नीसोबत आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी ईडीने समन्स पाठवले होते. यानंतर शुक्रवारी ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले असून त्यांची चौकशी सुरू झाली आहे.
प्रफुल्ल पटेल यांच्या कुटुंबाच्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व इक्बाल मेमनची पत्नी हजरा मेमन यांच्यात मालमत्ता विक्रीचा व्यवहार झाल्याची बाब अंमलबजावणी संचालनालयाकडून सुरू असलेल्या तपासात पुढे आली. यानंतर ईडीने प्रफुल्ल पटेल यांना समन्स पाठून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी पटेल यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील सर्व आरोप तथ्यहीन असून इक्बाल मिर्चीच्या पत्नीसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार केले नसल्याचे स्पष्ट होते.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
प्रफुल्ल पटेल यांच्या कुटुंबाची मालकी असलेल्या मिलेनियम डेव्हलपर्सला मिर्ची कुटुंबाकडून एक भूखंड देण्यात आला होता. हा भूखंड नेहरू प्लेनेटोरियमच्या समोर आहे. याच ठिकाणी मिलेनियम डेव्हलपर्सने 15 मजली इमारत उभी केली आहे. त्याचे नाव सीजे हाऊस असे ठेवण्यात आले आहे. दरम्यान, इकबाल फरारी होता आणि त्याचा 2013 मध्ये लंडनमध्ये मृत्यू झाला होता. पटेल यांच्या कुटुंबाने प्रमोट केलेली कंपनी आणि मिर्ची या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इकबाल मेमन यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे. पटेल यांच्या कुटुंबाकडून प्रमोटेट कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिडेट आणि मिर्ची कुटुंबात झालेल्या व्यवहाराची चौकशी ईडी करत आहे.


























































